पीटीआय, लखनौ
पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक इंच आता ‘ब्राह्मोस’च्या कक्षेत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक ‘झलक’ होती, असा इशारा देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पाकिस्तानला सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील विजय हा भारतासाठी सवयीचा भाग बनला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
लखनौ येथील ‘ब्रह्मोस एरोस्पेस युनिट’मध्ये निर्मिती झालेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. ब्रह्मोस हे भारताच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक असल्याचे सिंह या वेळी म्हणाले.
‘ब्रह्मोस हे केवळ एक क्षेपणास्त्र नसून, ते भारताच्या सामरिक आत्मविश्वासाचा पुरावा आहे. लष्करापासून ते नौदल आणि हवाई दलापर्यंत, ते आपल्या संरक्षण दलांचे एक प्रमुख आधारस्तंभ झाले आहे,’ असे सिंह म्हणाले.
भारताची संरक्षण क्षमता आता एक शक्तिशाली परावर्तक म्हणून काम करते, असेही सिंह यांनी नमूद केले. ‘‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जे घडले ती फक्त एक झलक होती. पाकिस्तानला याचीही जाणीव झाली असेल की, भारत पाकिस्तान निर्माण करू शकतो, वेळ आली तर…मला जास्त काही सांगण्याची गरज नाही, असेही सिंह म्हणाले.
लखनौ युनिटमधील ‘ब्रह्मोस’ निर्मितीचा हा प्रकल्प संरक्षण उत्पादनात भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि क्षमतेचे प्रतीक आहे. हा प्रकल्प संयम, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचेही प्रतिनिधित्व करतो.- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
