पीटीआय, नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी करण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केला नाही असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’वरील विशेष चर्चेच्या दुसऱ्या दिवशी, जयशंकर यांनी हस्तक्षेप करत लोकसभेत मांडलेल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती केली. तसेच शस्त्रसंधी आणि व्यापार कराराचाही संबंध नव्हता असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यादरम्यान २२ एप्रिल ते १६ जून या कालावधीत एकदाही दूरध्वनीवरून संभाषण झाले नाही असे जयशंकर म्हणाले. यापूर्वी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना काँग्रेसने उत्तर दिले नाही असा आरोप करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. दहशतवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसने भारत आणि पाकिस्तानला स्वत:हून जोडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, आता मोदी सरकार योग्य धोरण राबवत असून पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला चोख आणि योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.
राहुल गांधी चीन-गुरू!
एस. जयशंकर यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा उल्लेख चीन-गुरू असा करत त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. राहुल यांच्यासारखे लोक बीजिंग ऑलिम्पिक्स स्पर्धेला हजेरी लावून आणि चीनच्या राजदूतांची विशेष शिकवणी लावून चीनविषयी ज्ञान मिळवतात असा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी केला. मात्र, आपण चीन-गुरूंप्रमाणे गोपनीय बैठका घेत नाही असे ते म्हणाले. चीन आणि पाकिस्तानदरम्यान १९६०पासून सहकार्य सुरू झाले, पण पूर्वीच्या सरकारांनी त्याविषयी काही केले नाही असे म्हणत त्यांनी काँग्रेसला जबाबदार ठरवले.
राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ घोषणा नाही
राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ घोषणा नाही तर ते नैतिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे असे मत राजदचे खासदार मनोज कुमार झा यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू ही संपूर्ण देशाला झालेली वेदना होती असे ते म्हणाले. मात्र, अशा राष्ट्रीय दु:खाच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेच्या आड लपून सरकारला वैध टीकेपासून स्वत:चा बचाव करता येणार नाही असे झा यांनी सुनावले.
काँग्रेसकडे इच्छाशक्तीचा अभाव नड्डा
यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्ती नव्हती असा दावा राज्यसभेचे नेते आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला. काँग्रेसने पाकिस्तानच्या बाबतीत नेहमी तुष्टीकरणाची भूमिका घेतली असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आपण सरकारमध्ये असताना काय करत होतो याची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असा सल्ला नड्डा यांनी दिला.