कानपूरमधील बिक्रू खेडय़ात विकास दुबे याच्या टोळीवर जो छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत असतानाच दुसरीकडे या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यातच आता हा विकास दुबे भाजपाच्या गोटातील असल्याचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केले जात आहेत. मात्र खरोखर विकास दुबेचा भाजपाशी काही संबंध होता का? यामागील सत्यता ‘अल्ट न्यूज’ या फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईटने शोधून काढली आहे. जाणून घेऊयात नक्की काय दावे केले जात आहेत आणि त्यामागील सत्यता काय आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो जन अधिकार पक्षाचे नेते राजेश राजन (ज्यांना पप्पू यादव नावाने ओळखले जाते) यांनी फेसबुकवरुन शेअर केला आहे. या फोटोमधील व्यक्ती ही विकास दुबे असल्याचा दावा राजन यांनी केला आहे. याच विकास दुबेला पकडण्यासाठी झालेल्या चकमकीमध्ये आठ पोलिसांना प्राण गमवावे लागले. “ही जी फूल देणारी व्यक्ती आहे ती तीच आहे जिने आठ पोलिसांचा जीव घेतला,” अशा कॅप्शनसहीत राजन यांनी हा फोटो शेअर केला आहे. तुम्हीच पाहा ही पोस्ट…
अशाच प्रकारची पोस्ट काँग्रेसशी संबंधित असणाऱ्या योगेश शुक्ला यांनाही केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला व्यक्ती हा भारतीय जनता पक्षाचा नेता आहे असं शुक्ला यांनी म्हटलं आहे. “हा आहे कानपूरमध्ये आठ पोलिसांचा जीव घेणारा भाजपा नेता आणि योगींचा समर्थक विकास दुबे,” अशा कॅप्शनसहीत शुक्ला यांनी एक फोटो शेअर केला आहे.
इतकचं काय समाजवादी पक्षाचे अली खान महुदाबाद यांनाही आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एका व्यक्तीचा मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोटो शेअर केला होता. मात्र नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. पण हा पाहा त्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट
मात्र या सर्व फोटोंमध्ये जी व्यक्ती दिसत आहे ही कानपूरमधील स्थानिक भाजपा नेते विकास दुबे यांची आहे. आपल्या फोटोंसहीत खोटी माहिती पसरवली जात असल्याचे दुबे यांनीच आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरुन सांगितलं आहे. “मी पंडीत विकास दुबे. भाजपाच्या कानपूर-बुंदेलखंड विभागाचा अध्यक्ष. सध्या मी या प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रमुख आहे. काही लोकांनी फेसबुकवर आणि ट्विटवर माझ्या फोटोंचा संबंध गुन्हेगार असणाऱ्या विकास दुबेशी जोडला आहे. मी या लोकांविरोधात तक्रार नोंदवणार आहे,” असं दुबे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
गलत पोस्ट करके लोगों को भ्रमित करने वाले सभी अराजक तत्वों के खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी pic.twitter.com/zZZayhWtgt
— vikasdubeybjp (@vikasdubeybjp2) July 3, 2020
याचबरोबर दुबे यांनी काही व्हायरल अफवांचे स्क्रीनशॉर्टही शेअर केले आहेत.
विकास दुबे आणि भाजपा नेत्याचा फोटो नीट पाहिल्याच त्यांच्या चेहरेपट्टीही वेगळी असल्याचे दिसून येते.
राजकीय संबंध काय?
एकंदरितच या सर्वांवरुन फरार विकास दुबेच्या नावाने भाजपा नेत्याचे फोटो व्हायरल केले जात असल्याचे सिद्ध होतं आहे. २००१ साली फरार विकास दुबेविरोधात भाजपा नेता संतोश शुक्लाच्या खून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर यामधून त्याची मुक्तता करण्यात आल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. तर हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार विकास दुबेने बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला होता. याच पक्षाकडून ते नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आला होता. तर झी न्यूजच्या वृत्तानुसार समाजवादी पक्षाच्या तिकीटावर दुबेची पत्नी रिचा दुबेने जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवली होती. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार २०१५ साली झालेल्या या निवडणुकीत दुबेची पत्नी निवडून आली होती.