Ex IPS Shivdeep Lande Election Result: आयपीएस म्हणून बिहारमध्ये पोलीस सेवेत आपल्या कर्तुत्वाने सिंघम ही बिरुदावली मिळवलेल्या शिवदीप लांडे यांना बिहारच्या जनतेने नेता म्हणून नाकारले आहे. पोलीस म्हणून शिवदीप लांडे यांना बिहारच्या जनतेने प्रेम दिले. त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. पोलीस दलातून राजीनामा देऊन शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला होता. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी अररिया आणि जमालपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना अपयश आले आहे.

शिवदीप लांडे यांनी २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी ‘हिंद सेना’ या राजकीय पक्षाची स्थापनाही केली होती. पक्षाची नोंदणी झाली नसल्यामुळे त्यांनी दोन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.

शिवदीप लांडे अररिया आणि जमालपूरमधून उमेदवारी अर्ज भरला होता. जमालपूरमध्ये त्यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत होती. याठिकाणी जनता दल (संयुक्त) पक्षाच्या नचिकेत यांनी लांडे यांचा पराभव केला. नचिकेत यांना ९६,६८३ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमाकांवर इंडियन इन्क्लूजिव्ह पार्टीच्या नरेंद्र कुमार यांना ६०,४५५ मते मिळाली. शिवदीप लांडे तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना १५,६५५ एवढी मते मिळाली.

जमालपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल

४९ वर्षीय शिवदीप लांडे यांनी बिहारच्या अररिया विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि तपशीलाची माहिती दिली होती. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांनी २०.४ कोटींची एकूण संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तर २.७ कोटींचे कर्ज असल्याचेही सांगितले. पोलीस सेवेत असताना त्यांच्या बेधडक कारवायांमुळे ते चांगलेच प्रसिद्ध झाले होते. मात्र ही प्रसिद्धी त्यांना राजकारणात कामी आली नाही.

अररिया विधानसभा मतदारसंघात शिवदीप लांडे यांचा दारूण पराभव झाला. याठिकाणी त्यांना चौथ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाच्या अबीदूर रहमान यांनी ९१,५२९ मते घेऊन याठिकाणी विजय मिळवला. तर शिवदीप लांडे यांना केवळ ४,०८५ मते मिळाली. एमआयएम पक्षाचे मोहम्मद मन्झूर आलम हे तिसऱ्या स्थानावर होते, त्यांनी ५३,४२१ मते घेतली.

अररिया विधानसभा मतदारसंघाचा निकाल

शुक्रवारी लागलेल्या निकालात भाजपा-जदयूच्या एनडीए आघाडीने अभूतपूर्व असे यश मिळवले. बिहार विधानसभेतील २४३ पैकी २०२ जागांवर एनडीएचा विजय झाला आहे. तर राजद-काँग्रेस महाआघाडीचे अशरक्षः पानिपत झाले. त्यांना केवळ ३५ जागा मिळवता आल्या.

कोण आहेत माजी IPS शिवदीप लांडे?

माजी आयपीएस, दबंग अधिकारी अशी ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईत यूपीएससीची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली आणि २००६ साली ते आयपीएससाठी निवडले गेले. लांडे यांना बिहार केडर मिळाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले. म्हणूनच त्यांनी जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघाची निवड केली होती.

माजी मंत्री विजय शिवतारेंचे जावई

शिवदीप लांडे हे बिहार केडरचे अधिकारी असले तरी त्यांची नियुक्ती काही काळासाठी महाराष्ट्रात करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचे २०१४ साली लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही त्यांनी दिला. त्यानंतर तीन वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात असताना अमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे.