Punjab Police Crime : पंजाब पोलीस दलातील माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी माजी मंत्री रजिया सुलताना यांचा मुलगा अकील अख्तर याचा त्यांच्या पंचकुला येथील निवासस्थानी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. मात्र, आपल्या मुलाचा मृत्यू हा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाल्याचा दावा कुटुंबाने केला होता. त्यामुळे या प्रकरणात कोणालाही काही संशय आला नाही. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं दिसून येत आहे.
माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा आणि मुस्तफाची पत्नी रझिया सुलतानासह आणखी चार जणांवर या प्रकरणात कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे. मुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात वडील आणि आईवर गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आता माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुस्तफा यांनी म्हटलं की, “माझ्या मुलाच्या मृत्यूने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण ज्यांनी खोट्या आणि निराधार तक्रारी दाखल करून एफआयआर दाखल केला, त्यांनाही कायद्याला सामोरं जावं लागेल. मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला प्रचंड दुःख झालं आहे, पण तरीही अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे. कायदा कोणत्या दिशेने काम करेल हे लवकरच सर्वांना कळेल”, असं मुस्तफा यांनी म्हटलं.
तसेच मुस्तफा यांनी त्यांच्या निवेदनात असंही म्हटलं की, “जर पोलिसांना कोणत्याही प्रकरणात लेखी तक्रार मिळाली तर एफआयआर नोंदवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पंचकुला पोलिसांनी हे कर्तव्य बजावलं आहे आणि मी त्याचे स्वागत करतो.”
मुलाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हिडीओत वडिलांवर गंभीर आरोप
वृत्तानुसार, समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये मोहम्मद मुस्तफा आणि माजी मंत्री रजिया सुलताना यांचा मुलगा अकील अख्तरने मृत्यूपूर्वी बनवलेल्या एका व्हिडीओत आपल्या वडिलांवर त्याच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा गंभीर आरोप केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच त्याची आई आणि बहीण या देखील या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणात आता पोलीस सखोल चौकशी करत आहेत.