अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन पोहचला आहे. दुपारी १२.२९ ला हा सोहळा सुरु होईल. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत ही पूजा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पूजा केली जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचं विशेष व्रतही ठेवलं होतं. आता आज रामलल्ला रामाच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. त्याचप्रमाणे रामाची अरुण योगीराज यांनी तयार केलेली मूर्तीही रामाच्या मंदिरात विराजमान होणार आहे. आज या सोहळ्यासाठी विविध सेलिब्रिटी येत आहेत. त्याचप्रमाणे बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री महाराजही आले आहेत. त्यांनी आज आपण खूप आनंदी असल्याचं म्हटलं आहे.

बागेश्वर धाम काय म्हणाले?

“आजपासून रामराज्य सुरु झालं आहे. मी या क्षणी खूप भावूक झालो आहे. मन उचंबळून टाकणाऱ्या भावना माझ्या मनात आहेत. आज आमचे हनुमानजी नाचत आहेत कारण राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होते आहे. आज आम्हीही प्रसन्न आहोत. सगळ्या भारताला मी अयोध्येतील पर्वाच्या शुभेच्छा देतो आहे.” असं बागेश्वर धाम यांनी म्हटलं आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली अयोध्या नगरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अमिताभ बच्चन, रजनीकांत, उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने नव्याने बांधलेल्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा मुख्य सोहळा सुरू होईल आणि सुमारे ४० मिनिटे चालेल. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण होईल. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश मिळणार असला तरी सोमवारी कोटय़वधी लोक दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमांतून हा सोहळा पाहण्याची अपेक्षा आहे. देशभरातील विविध मंदिरांमध्येही सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.

अयोध्या नगरीमध्ये फुलांची सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. तसेच रामायणाशी संबंधित विविध रांगोळ्या आणि चित्रे रेखाटण्यात येत आहेत. जुन्या इमारती आणि मंदिरेही दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली आहेत. भाविकांसाठी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी भोजनगृहांची व्यवस्था केली आहे. मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वीचे विविध विधी पार पडले. मंदिरासाठी देशभरातून कुंकू, अत्तर, विशाल घंटा, महाकाय कुलूप, १०८ फूट लांबीची अगरबत्ती, १,११० किलोचा दिवा, १२६५ किलोचा लाडू अशा विविध भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर या सीतेच्या माहेरून तीन हजार भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत.