MP Bathing Video Leak Case: मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका तरुणीनं हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या प्रियकराला पाठवल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणामुळे महाविद्यालयात खळबळ उडाली असून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर तरुणी पोलिसांच्या ताब्यात असून तिने नेमके कोणते व्हिडीओ किंवा फोटो प्रियकराला पाठवले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणी इतर मुलींच्या नकळत त्यांचे व्हिडीओ शूट करत होती. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून हा सगळा प्रकार चालू असल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तामध्ये नमूद केलं आहे. एका विद्यार्थिनीने या तरुणीला व्हिडीओ शूट करताना पाहिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला.
कसा उघड झाला प्रकार?
रविवारी सकाळी हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांपैकी एक तरुणी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिनं सदर तरुणीला शूटिंग करताना पाहिलं. शेजारच्या बाथरूमच्या पाईपवर चढून भिंतीवरून ही तरुणी व्हिडीओ शूट करत होती. यानंतर लागलीच पीडित तरुणीनं आरडाओरडा करून सगळ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. तसेच, महाविद्यालय आणि हॉस्टेल प्रशासनाकडे तक्रार केली.
यानंतर सोमवारी सकाळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी दमना पोलीस स्थानकाबाहेर संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी हजर झाले. पण त्यांना तिथून खामरिया पोलीस स्थानकात पाठवण्यात आलं. खामरिया पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी ही महाराष्ट्राच्या गोंदियाची असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.
चौकशीदरम्यान काय सांगितलं तरुणीनं?
चौकशीदरम्यान सदर तरुणीने या सगळ्या प्रकरणाबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. महाविद्यालयात शिकत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीतील एका तरुणाशी तिची मैत्री झाली. या मैत्रीचं लवकरच प्रेमात रुपांतर झालं. या दोघांनी मिळून काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. यातून सदर तरुणीने इतर तरुणींचे व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चंदीगड Video Leak प्रकरण काय आहे?
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारचं एक प्रकरण चंदीगढ विद्यापीठात चर्चेत आलं होतं. एका तरुणीवर असे आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यात सखोल तपास केला असता नवी माहिती समोर आली. सदर तरुणीने इतर विद्यार्थिनींचे कोणतेही आक्षेपार्ह व्हिडीओ वा फोटो प्रियकराला पाठवले नव्हते. या तरुणीने स्वत:चेच असे व्हिडीओ आणि फोटो प्रियकराला पाठवले होते. त्यानंतर सदर तरुणानं तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने इतर तरुणींचे सामान्य फोटो तरुणाला पाठवल्याचं पोलीस तपासात उघड झालं.