गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींमध्ये बिल्किस बानो या गर्भवती महिलेवर बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची दंगलखोरांनी हत्या केली होती. याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सोमवारी गोध्रा कारागृहातून त्यांची मुक्तता करण्यात आली. या बातमीमुळे बिल्किस बानोला प्रचंड धक्का बसला आहे. ‘न घाबरता जगण्याचा माझा हक्क मला परत द्या’ अशी विनंती बिल्किस बानोने गुजरात सरकाकरडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिल्किस बानोंचा न्यायावरील विश्वास डळमळीत

बिल्किस बानो भावूक होऊन म्हणाल्या की, “माझे कुटुंब आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि माझ्या 3 वर्षाच्या मुलीला हिसकावून घेणारे ११ गुन्हेगार आज मोकळे झाले हे ऐकून मी स्तब्ध झाले. मला अजूनही धक्का बसला आहे. आज मी एवढेच म्हणेन की – कोणत्याही स्त्रीला असा न्याय कसा मिळेल? माझ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयांवर माझा विश्वास होता. मी न्यायलयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवला आणि हळूहळू जगणे शिकत होते. मात्र, या दोषींच्या सुटकेने माझी शांतता हिरावून घेतली आहे आणि माझा न्यायावरील विश्वास डळमळीत झाला आहे. माझे दु:ख आणि माझा डळमळीत विश्वास केवळ माझ्यासाठीच नाही तर न्यायालयांमध्ये न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आहे”.

इतका मोठा आणि अन्यायकारक निर्णय घेण्यापूर्वी कोणीही माझ्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल विचारले नाही. मला शांततेने आणि न घाबरता जगण्याचा माझा हक्क परत द्या. कृपया मी आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची सुरक्षित जबाबदारी घ्या असे आवाहन बिल्किस बानोने गुजरात सरकारला केले आहे.

२१ जानेवारी २००८ रोजी सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा

२१ जानेवारी २००८ रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने खून आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्व ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. या दोषींनी १५ वर्षांहून अधिक काळ कारावास भोगल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने आपल्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला १९९२ च्या धोरणानुसार त्याची शिक्षा माफ करण्याच्या मुद्द्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. यानंतर सरकारने एक समिती स्थापन करून सर्व दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश जारी केले.

काय आहे घटना ?
गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत ३ मार्च २००२ रोजी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमावाने बिल्किस बानोच्या कुटुंबावर हल्ला केला. बिल्किस बानो त्यावेळी पाच महिन्यांची गर्भवती होती. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची निर्घृणपणे हत्या केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give me back my right to live without fear bilkis bano demand to gujarat government after release rape convicts dpj
First published on: 18-08-2022 at 12:24 IST