Ranya Rao Gold Smuggling Case : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला ४ मार्च रोजी बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी तिची झडती घेण्यात आली असता तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं. या सोन्याची किंमत तब्बल १२ कोटी असल्याचं सांगितलं जातं. या संपूर्ण प्रकरणामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली. रान्या राव ही १५ दिवसांतून चार वेळा दुबईला ये-जा करत असल्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं सांगितलं जातं.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दरम्यान, रान्या राव हिला न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी डीआरआय कोठडी सुनावली आहे. यावेळी डीआरआयकडून रान्या रावने सोन्याची तस्करी कशा प्रकारे केली? याची माहिती देखील न्यायालयाला दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ती एका रॅकेटचा भाग असल्याचा दावा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) न्यायालयासमोर केला. तसेच प्रोटोकॉलचा गैरवापर करून अशा गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर काही सिंडिकेट अस्तित्वात आहे का? याबाबतही न्यायालयाने चौकशी करण्याचे निर्देश डीआरआयला दिले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

रान्या रावने १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आणि सोने लपवून ४.८३ कोटी रुपयांचे सीमाशुल्क चुकविण्याचा प्रयत्न केला असल्याचं डीआरआयने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच रान्या रावने भारतात १४.२ किलो सोन्याची अवैधरित्या तस्करी करण्यासाठी कथित क्रेप बँडेज आणि टिश्यूजच्या मदतीने तिच्या शरीराभोवती सोन्याच्या पट्ट्या गुंडाळल्या होत्या. याचा खुलासा डीआरआयच्या कारवाईतून झाला.

“मला खूप मानसिक आघात होतोय”

तसेच जेव्हा रान्या रावला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तेव्हा न्यायालयाच्या बाहेर ती तिच्या वकिलांशी बोलताना ढसाढसा रडली. तिच्या वकिलांशी बोलताना तिने म्हटलं की, “मला खूप मानसिक आघात होतोय. मी या परिस्थितीत का पडले? याचा विचार आता माझ्या मनात येत आहे. विमानतळावर घालवलेल्या दिवसाच्या आठवणीत माझं मन हरवून जातंय. मला झोप येत नाही, मी मानसिक आघातातून जात आहे”, असं म्हणत रान्या रावने अश्रू ढाळत आपल्या वकिलांना सांगितलं.

दरम्यान, डीआरआयने न्यायालयाला सांगितलं की, रान्या रावचे मोबाईल फोन आणि लॅपटॉपमधील डाटाच्या संदर्भात फॉरेन्सिक अहवालासाठी कोठडीची आवश्यकता आहे. यावेळी न्यायालयाने डीआरआयला सिंडिकेटच्या सहभागाबद्दल आणि प्रोटोकॉलच्या गैरवापराबद्दल देखील चौकशी करण्याचे निर्देश दिले.

कोण आहे अभिनेत्री रान्या राव?

रान्या रावने (Ranya Rao) कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या रावला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिची कसून चौकशी करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold smuggling case i cant sleep im in a lot of mental distress actress ranya rao cried while talking to her lawyer gkt