पीटीआय, चेन्नई
GST reform Updates: केंद्र सरकारकडून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणा या प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या विजयाची बाब ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी व्यक्त केला. या सुधारणा दिवाळीच्या आधी करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. मात्र त्याच्या आधीच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
चेन्नई येथे व्यापर आणि उद्योग परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारताच्या प्रगतीसाठी कर सुधारणा’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी सीतारामन बोलत होत्या. यापूर्वी घरगुती वापरातील ९९ टक्के वस्तूंवर १२ टक्के जीएसटी लागू केला जात होता. तेच प्रमाण आता ५ टक्क्यांवर आणले गेले आहे. त्यामुळे ३५० उत्पादने स्वस्त होणार असून हे नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
या कर सुधारणांमुळे घरगुती उत्पादन स्वस्त होणार असल्याने मोठा फायदा नागरिकांना होणार आहे, याचा पुनरुच्चार अर्थमंत्र्यांनी केला.
२०१७मध्ये सुरू झालेल्या जीएसटी करप्रणालीत पहिल्या वर्षी ६६ लाख व्यापाऱ्यांची नोंदणी झाली होती. तोच आकडा गेल्या आठ वर्षांत आता दीड कोटींच्या घरात पोचला आहे. येत्या वर्षांत हे प्रमाण आणखी वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती देतानाच सीतारामान यांनी जीएसटीचा उल्लेख ला ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका केली.