२००२ साली झालेल्या गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. गोध्रा येथील कारागृहात ते शिक्षा भोगत होते. शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता. गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आल्याचे गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राज कुमार यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सू ची यांना आणखी ६ वर्षे तुरुंगवास ; भ्रष्टाचाराच्या चार प्रकरणांत दोषी

गुजरातमधील लिमखेडा तालुक्यात ३ मार्च २००२ रोजी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यावेळी त्या ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या. यावेळी बिल्किस बानो यांच्यावरील बलात्कारासोबतच त्यांची ३ वर्षीय मुलगी आणि इतर १४ जणांची हत्या करण्यात आली होती. पुढे न्यायासाठी बिल्किस बानो यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणीची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. जीवे मारण्याची धमकी येत असल्यामुळे न्यायालयीन सुनावणीसाठी हे प्रकरण गुजरातमधून महाराष्ट्रात स्थानांतरित करावे, अशी मागणी बिल्किस बानो यांनी केली होती. बानो यांची ही मागणी पुढे मान्य करण्यात आली होती.

हेही वाचा >>> श्रीलंकेच्या सागरी सुरक्षेसाठी भारताचे ‘डॉर्निअर’ दाखल ; द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत

याआधी २१ जानेवारी २००८ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील १३ जणांना दोषी ठरवले होते. त्यातील ११ जणांना सामूहिक बलात्कार तसेच हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ साली ही शिक्षा कायम ठेवली. तसेच २०९ साली सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या त्रिसदस्याय खंडपीठाने बिल्किस बानो यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश गुजरात सरकारला दिले होते.

सुटका झालेल्या दोषींची नावे

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात एकूण ११ जण जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. यातील सर्व म्हणजेच जसवंत नई, गोविंद नई, शैलेश भट्ट, राध्येशम शाह, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोरधिया, बकाभाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चंदना या दोषींची सुटका करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat riots bilkis bano gang rape case 11 lifers convicted set free in godhra prd
First published on: 16-08-2022 at 08:13 IST