पीटीआय, रांची, कथुआ, चमोली
देशभरात गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक जीवितहानी झारखंडमध्ये झाली असून, तिथे पाच जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये दोन आणि उत्तराखंड व तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेश आणि राजस्थानलाही मुसळधार पावसाचा फटका बसला. हिमाचल प्रदेशात राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद करम्यात आले. तर राजस्थानात रस्ते आणि रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले. दिल्लीमध्ये रविवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

झारखंडच्या सेरायकेला जिल्ह्यात एक घर कोसळून एक महिला आणि तिच्या सात वर्षीय मुलगा ठार झाले. अन्य एका घटनेत पुराच्या पाण्यात एक दाम्पत्य वाहून गेले. अन्य घटनांमध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता आहेत आणि इतर अनेकजण जखमी आहेत.

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी आणि कथुआ या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र घटनांमध्ये दोन जण मरण पावले. तमिळनाडूमध्ये विजेचा धक्का बसून एका सफाई कामगाराचा मृत्यू झाला तर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एक महिला ठार झाली.