Hiroshima Day 2023 : १९४५ हे वर्ष सुरु होतं.. जगात दुसरं महायुद्ध चाललं होतं. अशात दिवस उगवला ६ ऑगस्ट १९४५ चा. १९३९ पासून सुरु झालेल्या महायुद्धात जपानने सुरुवातीच्या काळात बाजी मारली होती. अगदी अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करण्याचंही धाडस जपानने दाखवलं होतं. मात्र हे महायुद्ध शेवटाकडे आलं त्या वर्षी म्हणजेच १९४५ ला जपानला जे सहन करावं लागलं ती जखम भरुन यायला बराच काळ गेला. काळाच्या इतिहासाने जपानवर केलेली अश्वत्थाम्याची जखम ठरली जी आजही ठसठसते आहे.
६ ऑगस्ट १९४५ या दिवशी नेमकं काय घडलं?
६ ऑगस्टच्या सकाळी अमेरिकेने ‘अॅलोना गे’ बी-२९ या बॉम्बरने ‘लिटल बॉय’ नावाचा अणुबॉम्ब हिरोशिमावर १२-१५ किलोटन टीएनटीच्या बळाने हिरोशिमावर डागला. या अणुबॉम्बच्या रुपाने जपानच्या हिरोशिमा शहरातल्या ८० हजार लोकांचा मृत्यू जागीच झाला. तर ४० हजार लोक जखमी झाले. या धक्क्यातून जपानला सावरण्यासाठी वेळही न देता अमेरिकेने पुढच्या तीन दिवसात नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब डागला. दुसऱ्या महायुद्धातला हा सर्वात भयानक आणि भीषण हल्ला होता. अमेरिकेचा भेसूर आणि क्रूर चेहरा या रुपाने जगासमोर आला. ज्या ८० हजार मृतांना श्रद्धांजली म्हणून ‘हिरोशिमा डे’ म्हणजेच आजचा दिवस पाळला जातो.
हेही वाचा : Oppenheimer movie: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?
९ ऑगस्टला नागासाकी या शहरावर जो अणुबॉम्ब टाकला गेला त्या अणुबॉम्बचं नाव फॅटमॅन असं होतं.
वि. ग. कानिटकर यांच्या ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ पुस्तकात अणुबॉम्ब आणि या हल्ल्याचं यथार्थ वर्णन केलं आहे. हिरोशिमावर हल्ला करण्याचा निर्णय जुलै १९४५ मध्ये झाला होता. त्याचा उल्लेखही कानिटकर यांनी केला आहे. तसंच जपानी पत्रकाराने या हल्ल्याचं कसं वर्णन केलं आहे याचाही उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
काय उल्लेख आहे ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ पुस्तकात?
१७ जुलै १९४५ या दिवशी चर्चिल यांना अमेरिकेतून निरोप मिळाला. Babies Satisfactorily Born (बाळे सुखरुप जन्मली) अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट अमेरिकेने केल्याचं हे वृत्त होते. १६ जुलै १९४५ ला पहाटे साडेपाच वाजता न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट करण्यात आला होता. त्याच दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन आणि चर्चिल यांनी निर्णय घेतला की जपानविरोधात अणुबॉम्ब वापरायचा. यानंतर जपानला शरण येण्यास सांगितलं गेलं. मात्र तसं घडलं नाही.
५ ऑगस्ट १९४५ ला काय घडलं?
५ ऑगस्टला रविवार होता. या दिवशी १४ फूट लांबीचा ४ फूट व्यासाचा आणि साडेचार टन वजनाचा अणुबॉम्ब तैवान बेटावर एका अमेरिकन विमानात चढवण्यात आला. या विमानाचं नाव होतं अॅनोला गे. तर वैमानिकाचं नाव होतं कर्नल पॉल तिब्बतस. मध्यरात्री दीड वाजता तीन विमाने हिरोशिमा, कोकुरा, नागासाकी या जपानी शहरांवर घिरट्या घालून आली. हिरोशिमावर धुके नव्हते. त्यामुळे हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय पहाटे दोन वाजता पक्का करण्यात आला.
यमपाश घिरट्या घालत होता
६ ऑगस्ट १९४५ च्या दिवशी पहाटे पावणेतीनला अणुबॉम्ब घेऊन अॅलोना गे हे विमान आकाशात उडाले. सकाळ झाली. अॅलोना गे हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी हिरोशिमा शहरावर आले. हिरोशिमा या शहरात त्यावेळी ३ लाख ४३ हजार गृहस्थाश्रमी माणसे व १ लाख ५० हजार जपानी सैनिक होते. ३१ हजार ६०० फूट उंचीवरुन या माणसांच्या माथ्यावर मृत्यूचा भयानक यमपाश घिरट्या घालत होता. बरोबर ८ वाजून १५ मिनिटांनी विमानाच्या पोटातील दारे खटकन उघडली व अणुबॉम्ब अंतराळातून हिरोशिमाच्या दिशेने झेपावू लागला. ६० अंशाच्या कोनाने विमान निमिषार्धात फिरले. चाळीस, एकेचाळीस, बेचाळीस सेकंद होतात न होतात तोच डोळ्यापुढे अंधारी आणणारा भयानक, आगीचा लोळ जमिनीवर उठला व वेगाने वरवर येऊ लागला. हळूहळू हा लोळ पसरला व त्या लोळात हिरोशिमा अदृश्य झाले. हिरोशिमाच्या या कढईत ७५ हजारांवर माणसांची आहुती पडली. असं वर्णन ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या पुस्तकात करण्यात आलं आहे.
हेही वाचा : जे. रॉबर्ट ओपेनहाइमर आणि डॉ. होमी जे. भाभा: कसे होते दोन अणुशास्त्रज्ञांमधील ऋणानुबंध?
जपानी पत्रकाराने केलेलं वर्णन नेमकं काय?
पुढे वि. ग. कानिटकर म्हणतात, एका जपानी पत्रकाराने हिरोशिमावर काय घडले त्याचे प्रत्यक्ष वर्णन लिहून ठेवले आहे. तो लिहितो, ‘एकाएकी फिक्कट नारंगी रंगाच्या प्रकाशाने आकाश उजळून निघाले. पाठोपाठ सगळे आसमंत हादरु लागले; जीव गुदमरुन टाकणारा उष्णतेचा लोळ आणि प्रचंड वादळ सुटले. जे जे काही उभे होते ते धडाधड कोसळू लागले.काही सेकंदातच रस्त्यावरचे हजारो लोक आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या बागा प्रचंड उष्णतेच्या लोळाने भाजून निघाल्या. अनेक माणसे जागच्या जागी ठार झाली. बाकीची होरपळून निघून, त्या वेदनांनी धरणीवर आडवी झाली. भिंती, घर वा कारखाने आणि इतर सर्व वस्तू कोसळून पडल्या आणि हा सर्व ढिगारा, सुटलेल्या भयानक आवर्तात गिरक्या खात आकाशात फेकला जाऊ लागला. ट्रामगाड्या रस्त्यावरुन उचलल्या जाऊन फेकल्या गेल्या. जणू काही त्यांत वजनच नव्हते. जे माणसांचे झाले तेच घोडे, कुत्री आणि गुराढोरांचे झाले. सगळे काही विव्हळत पडले होते. हिरवा चाराही यातून वाचू शकला नाही. झाडे आगी लागून कोळसा झाली. हिरवी शेते रंग हरवून बसली. शेताशेतांतून गवत पेटावे तशा ज्वाला सरपटू लागल्या.’
‘ज्या विभागात मृत्यूचे रौद्र थैमान नव्हते, त्या शहारातील बाकीच्या भागात घरे कोसळत होती. वाकलेल्या तुळया आणि दगडविटांचे ढिगारे होत चालले. जी माणसे घराच्या पडझडीतून वाचली व बाहेर येऊ शकली, त्यांच्या चहूबाजूस आसमंत पेटलेले होते. जे त्या क्षणी वाचले ते गॅमा किरणांच्या परिणामाने वीस ते तीस दिवसात मृत्यूमुखी पडले. अणुबॉम्ब फुटल्यानंतर अर्ध्या तासाने हिरोशिमाच्या आजूबाजूचे आकाश स्वच्छ होते, तरी हिरोशिमावर मात्र पाऊस पडू लागला. जळपास पाच मिनिटे पाऊस झाला; पण पुनश्च वाऱ्याचे प्रचंड थैमान सुरु झाले व जे धुमसते ढिगारे पावसाने विझल्यासारखे वाटत होते ते एकदम धडाडू लागले. सायंकाळ झाली तेव्हा आगी विझत आल्या होत्या कारण जळण्यासारखे काही शिल्लकच राहिले नव्हते. हिरोशिमा शहरच अदृश्य झाले होते.’ असं वर्णन करण्यात आले आहे.
हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्बचा हल्ला करण्यात आल्यानंतर जपानने शरणागती पत्करली. १० ऑगस्ट १९४५ या हा तो दिवस होता. दुसऱ्या महायुद्धाचे गंभीर परिणाम जगात घडले. मात्र हा अणुबॉम्ब हल्ला आणि त्यामुळे झालेला नरसंहार हा इतिहासातला अत्यंत भयंकर आणि विदारक क्षण होता. इतिहासात या दिवसाचं वर्णन विनाशाचा दिवस असंच करण्यात आलं आहे.