Oppenheimer movie आज जगप्रसिद्ध ऑस्कर पुरस्कार २०२४ च्या सोहळ्याची सांगता झाली. या पुरस्कार समारंभात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सिलियन मर्फी याची निवड झाली तर त्याला ज्या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला त्या ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला तब्बल सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. हा सिनेमा २१ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. ओपेनहाइमर हा चरित्रपट असून प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ‘जे रॉबर्ट ओपेनहायमर’ यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीचे श्रेय ओपेनहाइमर यांच्याकडे जाते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जगातील पहिले आण्विक शस्त्र तयार केल होते. संशोधन क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या शास्त्रज्ञाचे भारताशी असलेले नाते या पार्श्वभूमीवर जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.  

कोण होते जे रॉबर्ट ओपेनहायमर ?

जे. रॉबर्ट ओपेनहाइमर हे ज्यू वंशाचे अमेरिकन ‘सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ’ होते. त्यांना “अणुबॉम्बचे जनक” मानले जाते. त्यांचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क येथे झाले होते. १९२५ साली हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज आणि गॉटिंगेन विद्यापीठातून भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. १९२७ साली त्यांना भौतिकशास्त्र या विषयात मॅक्स बॉर्न ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी ही प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी विविध शैक्षणिक पदांवर काम केले होते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया तसेच बर्कली येथे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान,  मॅनहॅटन प्रकल्पावर काम करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती.  तसेच १९४३ साली त्यांची न्यू मेक्सिकोमधील लॉस अलामोस प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाच्या यशामध्ये ओपेनहायमर यांचे नेतृत्व आणि वैज्ञानिक तज्ज्ञता महत्त्वाची ठरली. १६ जुलै १९४५ रोजी ‘ट्रिनिटी’ चाचणी  त्यांच्याच नेतृत्त्वाखाली पार पडली. शास्त्रज्ञांनी या पहिल्या अणुबॉम्बच्या चाचणीत यश मिळविले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली यशस्वी झालेल्या चाचणी नंतर जनरल अ‍ॅडव्हाझरी कमिटी ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या प्रमुखपदी ते बिनविरोध निवडून आले. परंतु दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे झालेला संहार पाहून त्यांना उद्विग्नता आली होती. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी हायड्रोजन बॉम्ब बनविण्यास विरोध केला होता. त्यांनी केलेल्या या विरोधामुळे अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या संचालक पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना देशद्रोही ठरविण्यात आले होते. परंतु नंतर झालेल्या चौकशीत ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. 

Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
posthumous organ donation of two women gave life to four people
शेतात राबणाऱ्या ‘त्या’ दोघींच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

आणखी वाचा: विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!

जे रॉबर्ट ओपेनहायमर यांचे विविध विषयातील संशोधन 

ओपेनहायमर यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. बॉर्न-ओपेनहायमर अ‍ॅप्रॉक्झिमेशन हा त्यांचा शोधप्रबंध प्रसिद्ध  आहे. विश्वकिरण, सैद्धांतिक खगोलशात्र, केंद्रकीय भौतिकी, पुंज विद्युतगतिकी, पुंज क्षेत्रीय सिद्धांत, वर्णपंक्तिदर्शन इत्यादी शाखांमधे ओपेनहायमर ह्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी त्यावेळी आपल्या शोधनिबंधातून गुरुत्वाकर्षणाजवळच्या कृष्णविवराच्या अस्तित्वाचा अंदाज वर्तवला होता तो अंदाज आज अक्षरशः खरा ठरला आहे. किंबहुना न्यूट्रॉन ताऱ्याच्या वस्तुमानाविषयी मांडलेले त्यांचे अनुमान आज सिद्ध झालेले आहे. 

ओपेनहायमर आणि भगवद्‌गीता यांच्यातील भावबंध 

ओपेनहायमर  हे संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. मूळ संस्कृत भाषेमध्ये असलेल्या भगवद्‌गीतेचे संपूर्ण वाचन त्यांनी केले होते. १ ऑगस्ट १९६५ साली प्रकाशित झालेल्या न्यूयॉर्क टाइम्स मॅगझिनला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत हिंदू धर्माविषयी व गीतेविषयीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. १९४५ साली करण्यात आलेल्या अणुबॉम्ब चाचणीतील भव्य विस्फोट पाहून त्यांना भगवत गीतेचे तत्वज्ञान स्मरले होते. त्या क्षणी ‘मीच मृत्यू आहे, जगाचा नाश करणारा आहे’ हे भगवद्‌गीतेतील श्री कृष्णाचे प्रसिद्ध तत्वज्ञान स्मरले, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. याच घटनेनंतर ते हिंदू धर्माकडे वळले. वास्तविक त्यांनी कधीच हिंदू धर्म स्वीकारला नाही. परंतु गीतेचे तसेच उपनिषदांतील तत्त्वज्ञान हे मानवी जीवन जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट तत्वज्ञान होते असे ते मानत. मूलतः त्यांना हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाविषयी आकर्षण होते असे जेम्स हीजीयांसारखे (professor of history, University of Massachusetts Dartmouth) अभ्यासक मानतात. 

आणखी वाचा: बारसूचा वाद: राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले मायनाक भंडारी कोण होते?

‘ट्रिनिटी’ चाचणीनंतरच्या क्षण आणि भगवद्‌गीता 

‘महाभारताचा’ एक भाग असलेला भगवद्‌गीता हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. हिंदू धर्मीयांसाठी या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री कृष्ण व अर्जुन यांच्यातील संवाद ही या ग्रंथाची रूपरेखा असली तरी या संवादातून व्यक्त होणारे तत्वज्ञान हे उच्चप्रतीचे आहे, असे अभ्यासक मानतात. भर युद्धात आपले स्वकीयच आपल्या विरोधात पाहून अर्जुनाच्या मनाची झालेली घालमेल व साक्षात भगवंताने विश्वरूपाच्या माध्यमातून दिलेले तत्वज्ञान ही गीतेतील रूपरेखा प्रेरणादायी ठरली, असे अनेक मान्यवरांनी लिहून ठेवले आहे. वैयक्तिक चिंतांची पर्वा न करता आपल्या कर्तव्याची जाण ठेवून धर्म पालनाची शिकवण या ग्रंथातून देण्यात आली आहे. अर्थ, धर्म, काम व मोक्ष यांच्या माध्यमातून धर्म आचरण कसे करावे याची शिकवण गीतेतून मिळते. त्यामुळेच ओपेनहायमर हे देखील ‘ मी अर्जुनाप्रमाणे माझे कर्तव्य बजावले’ असे नमूद करतात. महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन श्रीकृष्णाच्या विराटरूपाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतो त्यावेळी त्याला श्रीकृष्णाने दिलेल्या विराट रूपाचे वर्णन गीतेच्या अकराव्या अध्यायात बाराव्या श्लोकात केलेले आहे. ओपेनहायमर यांनी  ‘ट्रिनिटी’ चाचणीनंतरच्या क्षणाचे वर्णन करताना पुढील श्लोकाचा संदर्भ दिला आहे. 

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता | यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ||

भगवंताचे विराट रूप  आणि अणुबॉम्बचा स्फोट 

अर्जुनाला झालेल्या भगवंताच्या विराट रूपाच्या दर्शनाचा क्षण १९४५ सालाची अणुबॉम्ब चाचणी पाहून ओपेनहायमर यांच्या मनात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला प्रकाशाचा स्फोट पाहून त्यांना गीतेतील श्री कृष्णाच्या विराट रूपाची आठवण झाली, असे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या हिंदू तत्वद्न्यानाची जाणीव त्यांना या स्फोटाच्या वेळी झाली. केवळ इतकेच नाही तर या क्षणाचे वर्णन करताना, मीच मृत्यू आहे, मीच जगाचा नाश करणारा आहे या गीतेतील श्री कृष्णाच्या अकराव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकाचा वापर त्यांनी मुलाखतीत केला होता. ओपेनहायमर यांचे निधन वयाच्या ६२ व्या वर्षी झाले. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सन्मानार्थ त्यांना अनेक पारितोषिके मिळली होती. त्यात ‘मेडल ऑफ मेरिट’, फ्रेंच सरकारचा ‘लिजन ऑफ ऑनर’ हा लष्कराचा सर्वोच्च किताब, रॉयल सोसायटी, लंडनचे परदेशी सदस्य इत्यादीं पुरस्कारांचा यात समावेश आहे. इतकेच नव्हे तर ‘६७०८५-ओपेनहायमर’ या लघु ग्रहाला त्यांचे नाव देण्यात येवून त्यांचा त्यांच्या कामाचा सत्कार करण्यात आला आहे. चंद्रावरील एका विवरालाही ओपेनहायमर यांचे नाव देण्यात आले आहे.