चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. ग्रीस दौऱ्यावरून मोदी थेट इस्रोच्या बंगळुरूतील मुख्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर उतरलेल्या जागेला ‘शिवशक्ती’ असं नाव देण्यात आल्याची घोषणा मोदींनी केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर ज्या ठिकाणी उतरलं, ती जागा आता ‘शिवशक्ती’ पॉईंट नावानं ओळखली जाईल. भारताच्या चांद्रयान-३ नं २३ ऑगस्टला चंद्रावर लँडिग केलं आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाणार आहे. चांद्रयान-२ चे लँडर ज्या ठिकाणी कोसळलं, त्या स्थानालाही तिरंगा पॉईंट म्हणून ओळखलं जाईल,” असं मोदींनी सांगितलं.

हेही वाचा : चांद्रयान ३ मोहिमेबाबत बोलताना मोदी भावुक; म्हणाले, “जेव्हा यान उतरलं…!”

“चंद्र आपल्या मालकीचा नाही”

यावरून काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राशिद अल्वी म्हणाले, “चंद्राच्या पृष्ठभागाचे नामकरण करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला? हे हास्यास्पद आहे. या नामकरणानंतर पूर्ण जग आपल्यावर हसेल. चंद्राच्या त्या भागावर लँडिंग झाली, याचा आम्हाला गर्व आहे. पण, चंद्र आपल्या मालकीचा नाही. अथवा लँडिंग पॉईंटही आपल्या मालकीचा नाही.”

“भाजपाला नाव बदलण्याची सवय”

“असे करणे भाजपाचा स्वभाव झाला आहे. सत्तेत आल्यापासून नाव बदलण्याची त्यांना सवय झाली आहे,” अशी टीका राशिद अल्वी यांनी केली.

हेही वाचा : ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडत ‘प्रज्ञान’चा प्रवास सुरु, ‘इस्रो’नं शेअर केला VIDEO

“पंतप्रधान मोदी राजकारण करत आहेत”

यूपीए सरकारच्या काळात चांद्रयान-१ उतरलेल्या भागाला जवाहर पॉईंट नाव ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न विचारल्यावर राशिद अल्वी यांनी म्हटलं, “जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच ‘इस्रो’ आहे. १९६२ साली जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केली होती. पंडित नेहरू ‘इस्रो’चे संस्थापक होते. तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. पण, पंतप्रधान मोदी राजकारण करत आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did pm modi name chandrayaan 3 landing point shivshakti say congress leader rashid alvi ssa