Hyderabad Fire Latest Updates: रविवारी पहाटे हैदराबादमधील जगप्रसिद्ध चारमिनार वास्तूजवळ एका इमारतीला भीषण आग लागली. गुलजार हौज परिसरातील या तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत सोबत राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात ८ लहान मुलांचा समावेश होता. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात शोकाकुल वातावरण असून आसपासच्या स्थानिकांकडून रविवारी सकाळी इमारतीचा जळून कोळसा झाल्यानंतरचं दृश्य काय होतं, याची माहिती इंडियन एक्स्प्रेसनं घेतली.

सकाळी नेमकं काय घडलं?

अग्निशमन विभागाचे महासंचालक वाय. नेगी रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचा पहिला फोनकॉल सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी आला. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळासाठी रवाना झाल्या. पण सकाळी आग लागल्याचं बाहेरच्या लोकांना समजण्याआधीच बराच काळ इमारतीत ही आग धुमसत होती, असं स्थानिकांनी सांगितलं.

सकाळी बचाव पथकाकडून इमारतीत आगीच्या भडक्यापासून कुणी वाचलं आहे का याचा शोध घ्यायला सुरवात करण्यात आली. त्यांना काही स्थानिकांनीही मदत केली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या त्या इमारतीत नेमकं काय दृश्य दिसलं, याची मन सुन्न करणारी माहिती या स्थानिकांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

“आम्ही तिथे गेलो तेव्हा आत सारंकाही शांत होतं. फक्त आगीच्या काही ज्वाळा मध्येच एखाद्या राखेच्या ढिगातून आवाज करत होत्या. तिथे इतकी नीरव शांतता होती की कुणीही बचावासाठी आवाज देत नव्हतं. सगळंकाही निपचित होतं”, अशी माहिती स्थानिक दुकानदार झुबान यांनी दिली.

दुसरे एक स्थानिक झमान यांनी सांगितलं की, “सकाळी आम्ही जेव्हा झोपेतून जागे झालो, तेव्हा त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा बाहेर येत होत्या”.

फक्त एक जिना, तोही एकच मीटर रुंद!

दरम्यान, इमारतीच्या बांधकामातील त्रुटींमुळे बचाव कार्यात मोठे अडथळे आल्याचं रेड्डी यांनी नमूद केलं. “इमारतीत वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी फक्त एकच जिना होता. हा जिना फक्त १ मीटर रुंद होता. या जिन्यावर पूर्णपणे धूर भरला होता. इमारतीतून बाहेर पडण्यासाठी दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नव्हता. शिवाय, सगळ्यात खालच्या मजल्यावर इमारतीत जाण्यासाठीचा मार्ग पार्क केलेल्या दुचाकींमुळे पूर्णपणे बंद झालेला होता. या दुचाकींमधील पेट्रोलमुळेही आगीचा भडका आणखी वाढला”, अशी माहिती डीजी नेगी रेड्डी यांनी निवेदनात दिली आहे.

प्रत्येक खोलीत होते मृतदेह

“अग्निशमन दलाचे जवान जेव्हा बचावकार्यासाठी इमारतीत गेले, तेव्हा ते ओरडत होते की प्रत्येक खोलीत मृतदेह दिसत आहेत. एका खोलीत एक महिला तिच्या दोन चिमुकल्या मुलांना आगीपासून वाचवण्यासाठी कवेत घेऊन थांबली, पण तिला यश आलं नाही. तशाच अवस्थेत ते तिघे होरपळून मृत्यूमुखी पडले. त्यांचे मृतदेहदेखील त्याच अवस्थेत दिसत होते”, अशी माहिती स्थानिक रहिवासी झुबान यांनी सांगितली.

पहिल्या मजल्यापासून आगीला झाली सुरुवात

दरम्यान, अग्निशमन विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, आग सर्वात आधी खालच्या मजल्यावरच्या ज्वेलरीच्या दुकानात लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. त्यानंतर ती वेगाने पहिल्या मजल्यावर पोहोचली. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास आग पसरण्यास सुरुवात झाली. सकाळी १०.३० पर्यंत अग्निशमन दलानं सर्व १७ मृतदेह इमारतीबाहेर काढले. जर आग वेळीच विझवली गेली नसती, तर आसपासच्या इमारतींमध्येही ती पसरली असती, असं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे.