मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदीय पावसाळी अधिवेशन गाजलं आहे. विरोधकांनी दोन्ही सभागृह दणाणून सोडलं आहे. पंतप्रधानांनी सभागृहात याबाबत निवेदन सादर करावं, यावर विरोधक आग्रही आहेत. या मुद्द्यावरून आजही राज्यसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात चांगलीच जुंपली. यावेळी मी ४५ वर्षांपासून विविहित आहे, त्यामुळे मला राग येत नाही, असं जगदीप धनखड म्हणाले. त्यामुळे सभागृहात खसखस पिकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खरगे यांना बोलण्याची संधी दिली. परंतु, लागलीच त्यांना खाली बसण्याची विनंती केली. “तुम्ही जरा रागात आहात वाटतं,” असं खरगे म्हणाले. त्यावर जगदीप धनखड म्हणाले की, “मी ४५ वर्षांपासून विवाहित आहे. मला कधीच राग येत नाही.” धनखड यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

“चिदंबरम हे ज्येष्ठ वकिल आहेत. या सभागृहातील ज्येष्ठ नेते आहे. त्यांनाही माहित असेल की आम्हाला आमचा राग अधिकाऱ्यांना दाखवण्याचा अधिकार नाही. तुम्ही एक अधिकारी आहात”, असंही धनखड खरगे यांना म्हणाले. “माझी पत्नी या सभागृहाची सदस्यही नाही. त्यामुळे तिच्याबद्दल येथे चर्चा करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या राग येण्याच्या टिप्पणीत बदल करावा”, अशी विनंतीही धनखड यांनी खरगे यांना केली.

खरगेंचीही मिश्किल टिप्पणी

धनखड यांच्या वक्तव्यावर खरगे यांनीही मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, “तुम्ही रागवत नाही. राग दाखवत नाहीत. पण आतून राग राग करता.” खरगे यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात पुन्हा हशा पिकला.

राज्यसभा तहकूब

दरम्यान, आज राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. अखेर, राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आता पुढील कामकाज थेट सोमवारपासून सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have been married for 45 years i am angry lok sabha speakers statement caused laughter in the house sgk