पीटीआय, जोधपूर, भोपाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांचा दौरा केला. दोन्ही राज्यांमध्ये त्यांनी हजारो कोटी रुपयांची तरतूद असलेल्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

नरेंद्र मोदी यांनी राजस्थानात पाच हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामुळे राज्यामध्ये विकासाला अधिक चालना मिळेल असे ते म्हणाले. जोधपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांतील विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. आपल्याला एकत्रितपणे राजस्थानचा विकास घडवायचा आहे असे ते यावेळी झालेल्या कार्यक्रमात म्हणाले.

हेही वाचा >>>“पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री…”, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ‘ते’ विधान चर्चेत!

राजस्थानात २०१४ मध्ये केवळ ६०० किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले होते, गेल्या नऊ वर्षांमध्ये त्यात वाढ होऊन तीन हजार ७०० किमीपेक्षा जास्त लांबीचे रेल्वेमार्गाचे राज्यात विद्युतीकरण झाल्याची माहिती मोदी यांनी दिली.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अशोक गेहलोत सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून टीका केली. राजस्थानात झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे राज्यातील लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले असून हे युवक न्यायाची मागणी करत आहेत असे ते म्हणाले.

मध्य प्रदेशात पंतप्रधानांच्या हस्ते १२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना मोदी यांनी गांधी कुटुंबाचे नाव न घेता, विकासासाठी काँग्रेसमध्ये केवळ एकाच कुटुंबाची प्रशंसा केली जात असल्याची टीका केली. केवळ एका कुटुंबामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही किंवा त्यांच्यामुळेच विकास झाला नाही असे ते म्हणाले.