पीटीआय, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन

अमेरिका भारताबरोबर व्यापार करार करण्याच्या अगदी समीप आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने परस्परसमान करधोरण स्थगितीला तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये येत्या तीन आठवड्यांत व्यापार करार होण्याची शक्यता आहे. ज्या देशांबरोबर व्यापार करार शक्य नाही, अशा देशांना ट्रम्प प्रशासनाने आयातशुल्काबाबत पत्र पाठविण्यास सुरुवात केली आहे.

ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही ब्रिटन, चीनबरोबर करार केला. भारताबरोबर करार करण्याच्या समीप आहोत. इतर देशांच्या प्रतिनिधींना आम्ही भेटलो. आम्ही त्यांच्याबरोबर करार करू शकू, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आता फक्त पत्र पाठवले आहे. तुम्हाला आमच्याशी व्यापार करायचा असेल, तर अमुक एक रक्कम तुम्हाला भरावी लागेल.’

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेने ठेवलेल्या ठराविक मुदतीमध्ये भारत करार करणार नसल्याचे वक्तव्य केले होते. करार अंतिम झाल्यानंतरच तो स्वीकारण्यात येईल, त्याची औपचारिक घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले होते. भारताने कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र अद्याप खुले केलेले नाही. अमेरिकेला त्यात सवलती देण्यामध्ये आव्हाने आहेत.

विविध देशांना ट्रम्प प्रशासनाकडून पत्रे

अमेरिकेने करसवलतीला मुदतवाढ देतानाच ही मुदत संपल्यानंतर कुठल्या देशांवर किती आयातशुल्क लावले जाईल, यासंबंधीची पत्रे पाठविण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेश, बोस्निया, हर्त्झगोविना, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, कझाकस्तान, लाओस, मलेशिया, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, थायलंड, ट्युनिशिया या देशांना ट्रम्प प्रशासनाने पत्र पाठविले आहे. पहिल्या टप्प्यात पत्र पाठविण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश नाही. ‘अमेरिकेने लागू केलेल्या आयातशुल्कानंतर संबंधित देशाने अमेरिकेच्या वस्तूंवरील करात वाढ केली, तर अमेरिकेने लागू केलेल्या दरामध्येदेखील तितकीच वाढ होईल,’ असा इशारा ट्रम्प यांनी पत्र पाठविलेल्या देशांना दिला आहे.

नेतान्याहू यांच्याकडून ट्रम्प यांना नोबेलची शिफारस

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इराणवरील आण्विक केंद्रांवर यशस्वी हल्ला केल्याचा विजयोत्सव साजरा केला. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल सन्मान मिळावा, अशी शिफारस करणारे पत्र नेतान्याहून यांनी नोबेल समितीला लिहिले आहे. या पत्राची प्रत त्यांनी ट्रम्प यांना भेट दिली. दोन्ही नेत्यांनी व्हाइट हाउसमध्ये एकत्रित जेवण केले.

ट्रम्प यांच्या दाव्यावरून काँग्रेसची टीका

● वॉशिंग्टन, नवी दिल्ली : ‘भारत-पाकिस्तानमधील युद्ध मीच थांबविले,’ असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला. ‘दोन्ही देशांनी संघर्ष सुरू ठेवला, तर त्यांच्याबरोबर व्यापार करणार नाही, असे त्यांना सांगितले,’ असे ट्रम्प म्हणाले. ‘आम्ही गेल्या तीन आठवड्यांत भारत आणि पाकिस्तान, सर्बिया, कोसोवो, रवांडा आणि काँगो आणि संघर्षास उत्सुक इतर देशांमधील संघर्ष थांबविला. यातील सर्वांत, सर्वाधिक मोठा संघर्ष हा भारत-पाकिस्तानमधील होता. व्यापारावरून आम्ही तो थांबविला.’

● ट्रम्प यांच्या दाव्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर पुन्हा टीका केली आहे. ‘भारत-पाकिस्तानमधील संघर्ष मी थांबविले, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमान २१ वेळा केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर आपले मौन केव्हा सोडणार आहेत,’ असा सवाल काँग्रेसने केला.

कुठल्या देशावर किती कर?

जपान, दक्षिण कोरिया – २५ टक्के

म्यानमार, लाओस – ४० टक्के

कंबोडिया, थायलंड – ३६ टक्के

सर्बिया, बांगलादेश – ३५ टक्के

इंडोनेशिया – ३२ टक्के

दक्षिण आफ्रिका, बोस्निया, हर्त्झगोविना – ३० टक्के

कझाकस्तान, मलेशिया, ट्युनिशिया – २५ टक्के