India US Trade Talks Commerce Minister Piyush Goyal to visit US on Monday : भारत आणि अमेरिका यांच्यात केल्या काही दिवसांपासून व्यापारी तणाव वाढला आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता हळूहळू हे संबंध पूर्वपदावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल हे सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी व्यापारासंबंधी चर्चेसाठी अमेरिकेला जाणार आहेत. यासंबंधीची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी दिली आहे.

या आठवड्यात नवी दिल्ली येथे एक बैठक पार पडली, ज्यामध्ये दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे सहायक व्यापार प्रतिनिधी (USTR) ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन शिष्टमंडळाने भारतीय अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

“अमेरिकेतून आलेल्या सहायक यूएसटीआरच्या नेतृत्वाखालील व्यापार प्रतिनिधींच्या एका पथकाने अमेरिकेबरोबर सुरू अलेल्या व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटी पुढे घेऊन जाण्यासाठी, १६ सप्टेंबर रोजी वाणिज्य मंत्रालयाबरोबर बैठक झाली. यावेळी सकारात्मक आणि भविष्याबद्दल चर्चा झाली, ज्यामध्ये व्यापार कराराबाबतच्या विविध अंगानी विचार करण्यात आला. परस्पर फायद्याचा करार लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात रशियन तेल घरेदी करण्याच्या मुद्द्यावरून भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला होता. आता अखेर दोन्ही देशांमध्ये थांबलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या आहेत

दिल्लीत चर्चा सुरू झाली त्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.