पीटीआय, पणजी

भारत नक्षलवादी-माओवादी दहशतीचा समूळ नायनाट करण्याच्या उंबरठ्यावर आहे. या संकटातून मुक्त झालेले १०० हून अधिक जिल्हे या वर्षी सन्मानाने दिवाळी साजरी करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. गोव्यातील किनाऱ्यावरील ‘आयएनएस विक्रांत’वर पंतप्रधान मोदी यांनी सशस्त्र दलांना संबोधित केले. या वेळी मोदींनी सुरक्षा दलांच्या शौर्याचे कौतुक केले.

भारताने नक्षली आणि माओवादी दहशतीविरुद्ध पूर्ण यश मिळवले आहे. देशभरात २०१४ पूर्वी जवळपास १२५ जिल्हे माओवादी हिंसाचाराच्या विळख्यात होते. परंतु गेल्या दशकात सरकारने उचललेल्या पावलांमुळे ही संख्या आता फक्त ११ जिल्ह्यांवर आली आहे. या ११ पैकी फक्त तीन जिल्हे त्यांच्या प्रभावाखाली आहेत, असे मोदी म्हणाले. आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्य आणि धाडसामुळेच गेल्या काही वर्षांत देशाने यानिमित्त आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. देश नक्षलवादी-माओवादी दहशतीपासून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

अनेक जिल्ह्यांमध्ये लोक पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहेत. ‘जीएसटी बचत उत्सवा’दरम्यान या भागात विक्रमी विक्री आणि खरेदी दिसून येत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांनी एकेकाळी संविधानाचा उल्लेखही दडपला होता, तिथे आता स्वदेशीचा मंत्र गुंजत आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. नक्षली-माओवादी दहशतीविरुद्धची ही किमया सुरक्षा दलांच्या बलिदानामुळेच साधता आली आहे, असे कौतुकोद्गारही मोदींनी काढले.

मोदींकडून राष्ट्रपतींना दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती कार्यालयाने ‘एक्स’वर या भेटीचे छायाचित्र प्रसिद्ध केले. यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि कुटुंबीयांनी मुर्मू यांची भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.