India US Defence Deal: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले गेलेले आहेत. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के आयातशुल्क लादलं आहे. एवढंच नाही तर भारताने रशियाकडून तेल आयात करू नये म्हणून ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत. या सर्व घडामोडी सुरू असताना भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारही रखडलेला आहे. या व्यापार करारावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं. मात्र, अद्याप दोन्ही देशांची या व्यापार करारावर एकमत झालेलं दिसत नाही.

असं असतानाच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारताने एक मोठा निर्णय घेतला असून अमेरिकेबरोबर एक ऐतिहासिक करार केला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये १० वर्षांचा संरक्षण करार झाला असून भारताचे संक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी १० वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

पीट हेगसेथ यांनी काय म्हटलं?

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या संदर्भात एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “भागीदारी वाढवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत शुक्रवारी अमेरिकेने भारताबरोबर १० वर्षांच्या संरक्षण आराखड्यावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांचे संरक्षण संबंध याआधी कधीही इतके मजबूत नव्हते”, असं पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं?

अमेरिकेबरोबर १० वर्षांच्या ऐतिहासिक संरक्षण कराराच्या संदर्भात राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये राजनाथ सिंह म्हटलं की, “अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याबरोबर माझी मलेशियात महत्वाची बैठक झाली. आम्ही १० वर्षांच्या अमेरिका-भारत प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी आराखड्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांत मजबूत संरक्षण भागीदारीत एक नवीन युग सुरू होईल”, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

“हा ऐतिहासिक संरक्षण करार भारत-अमेरिका संरक्षण संबंधांच्या संपूर्ण स्पेक्ट्रमला धोरणात्मक दिशा प्रदान करेल. हे आमच्या वाढत्या धोरणात्मक एकत्र येण्याचे संकेत आहेत आणि भागीदारीच्या नवीन दशकाची सुरुवात ठरेल. तसेच संरक्षण करार आमच्या द्विपक्षीय संबंधांचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून राहील”, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

भारताचा नुकताच रशियाबरोबर विमान निर्मितीचा करार

भारताने रशियाबरोबर विमान निर्मितीच्या क्षेत्रातील ऐतिहासिक करार केला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार आता सुखोई सुपरजेट SJ-१०० या नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यातून भारत SJ-१०० नागरी प्रवासी विमानांचं उत्पादन करण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या करारामागचं उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणे हे असून त्यामुळे भारताच्या विमान वाहतूक उद्योगासाठी एक नवीन युग असेल. या प्रकल्पामुळे प्रादेशिक विमानांची मागणी देखील पूर्ण होईल आणि विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. रशियाच्या मॉस्कोमध्ये मंगळवारी या कराराची स्वाक्षरी झाली असून भारताने पहिल्यांदाच संपूर्ण प्रवासी विमानाचं उत्पादन करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलं आहे.