यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट हंगामाला दिमाखात प्रारंभ केल्यानंतर सलग तीन पराभव पदरी पडलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचे शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सावरण्याचे आव्हान असेल.
इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताचा संघ कागदावर भक्कम मानला जात आहे; परंतु सांघिक समन्वय जुळून न आल्यामुळे सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजयी हंगामारंभ करणारा हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा एकमेव विजय गाठीशी असलेला राजस्थानचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे.
राजस्थान रॉयल्स
परदेशी खेळाडूंचे मर्यादित पर्याय
दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांची माघार तसेच लिआम लिव्हिंगस्टोन जैव-सुरक्षेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सपुढे परदेशी खेळाडूंचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. राजस्थानने मागील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध १० गडी राखून मानहानीकारक पराभव पत्करला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानला यंदाच्या हंगामात फक्त दिल्लीला हरवता आले आहे. पंजाब किंग्जविरुद्ध ११९ धावांची झुंजार खेळी साकारणाऱ्या सॅमसनला धावांचे सातत्य राखता आलेले नाही. जोस बटलर, मनन व्होरा आणि डेव्हिड मिलर यांच्यासारखे फलंदाज धावांसाठी झगडत आहेत. गोलंदाजी हीसुद्धा राजस्थानसाठी चिंतेची बाब आहे. ‘आयपीएल’ लिलावात लक्ष वेधून घेणाऱ्या ख्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझूर रेहमान यांना कामगिरी उंचावता आलेली नाही.
कोलकाता नाइट रायडर्स
तारांकितांकडून अपेक्षा
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्स फलंदाज म्हणून उदयास आला, हे कोलकातासाठी सुचिन्ह म्हणता येईल; परंतु तरीही तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. याचप्रमाणे कोलकाताच्या तारांकित फलंदाजांच्या अपयशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांची दमछाक झाल्याचेच प्रत्ययास आले आहे. शुभमन गिल आणि मॉर्गन ‘पॉवरप्ले’ची षटके संपण्याआधीच शरणागती पत्करत आहेत. आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिकला सूर गवसला आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज हाणामारीच्या षटकांमध्ये महागडे ठरले आहेत. चेपॉकच्या धिम्या खेळपट्टीवर झगडणाऱ्या कोलकाताला वानखेडेवर दिलासा मिळेल असे वाटते होते; परंतु फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या फलंदाजांनी ३ बाद २२० धावांचा डोंगर उभारून कोलकाताच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या.
१२-१०
कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत २३ सामने झाले असून, यापैकी १२ सामने कोलकाताने आणि १० सामने राजस्थानने जिंकले आहेत.
* वेळ : सायंकाळी ७.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स २, स्टार स्पोटर््स फर्स्ट, स्टार स्पोटर््स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)