सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान वकिलांनी चक्क व्हिस्कीच्या बाटल्या आणि टेट्रापॅक आणल्यानंतर खुद्द न्यायमूर्तींनीच आश्चर्य व्यक्त केलं. व्हिस्कीचं उत्पादन करणाऱ्या दोन बलाढ्य ब्रँडमधील वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होती. या सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींनी टेट्रापॅकवर चिंता व्यक्त करतानाच अशा गोष्टींची सरकार परवानगी कसं देतंय? असा सवालदेखील न्यायालयाने यावेळी विचारला. जॉन डिस्टिलरीज विरुद्ध अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलरीज यांच्यातील खटल्यादरम्यान झालेलं हे संभाषण चर्चेचा विषय ठरलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
जॉन डिस्टिलरीज कंपनी ओरिजिनल चॉईस या व्हिस्की ब्रँडचं उत्पादन करते, तर अलायड ब्लेंडर्स कंपनी ऑफिसर्स चॉईस या व्हिस्की ब्रँडचं उत्पादन करते. ओरिजिनल चॉईस हे नाव ऑफिसर्स चॉइससारखंच वाटत असल्यामुळे कॉपीराईटचा दावा अलायड ब्लेंडर्सनं केला होता. न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमलया बागची यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील मुकुल रोहतगी यांनी अचानक खटल्यातील बाबींचा पुरावा म्हणून न्यायालयासमोर चक्क व्हिस्कीच्या दोन बाटल्या आणि टेट्रापॅक ठेवले. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
कॉपीराईटच्या मुद्द्यावर पुरावा म्हणून वकील मुकुल रोहतगी यांनी दोन्ही कंपन्यांच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि टेट्रापॅक न्यायालयासमोर सादर केले. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी टेट्रा पॅकबाबत चिंता व्यक्त केली. हे टेट्रापॅक स्वस्त असल्यामुळे त्यांची खरेदी जास्त होते, असं मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं. यावेळी न्यायालयाने व्हिस्की टेट्रा पॅकमध्ये देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.
काय म्हणाले न्यायमूर्ती सूर्य कांत?
“हे असं करण्याची परवानगी तरी दिली जाऊ शकते का? कारण शाळा-महाविद्यालयांमध्ये हे असे टेट्रा पॅक घेउन जाणं अतिशय सोपं आहे”, अशी चिंता न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी व्यक्त केली. त्यावर, “हे असंच चालू आहे. त्यामुळेच त्यांचा खप इतका जास्त आहे”, असं रोहतगी म्हणाले. “अशा प्रकारे टेट्रा पॅकमध्ये विकली जाणारी व्हिस्की मी पहिल्यांदाच पाहातो आहे”, अशी पुस्तीही न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी जोडली.
यावेळी वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सदर टेट्रा पॅक व्हिस्कीचे असल्याचं अजिबात वाटत नाही, शिवाय त्यावर कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक सूचनाही दिलेली नसते, अशी माहिती न्यायालयाला दिली. त्यावरही न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी नाराजी व्यक्त केली. “मला कळत नाही की सरकार अशा प्रकारचे पॅकिंग वापरायची परवानगी कशी देत आहे?” असा सवाल त्यांनी केला. न्यायमूर्ती बागची यांनीदेखील त्यावर नाराजी व्यक्त करताना “सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे”, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले.
कॉपीराईट खटल्याबाबत मध्यस्थाचा मार्ग
दरम्यान, जॉन डिस्टिलरीज विरुद्ध अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलरीज हे प्रकरण न्यायालयाने मध्यस्थ म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एल. नागेश्वरा राव यांच्याकडे सोपवलं आहे.
