भाजपा खासदार मनेका गांधी व त्यांचे पुत्र वरुण गांधी त्यांच्या भाजपा विरोधी भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. मात्र, आता मनेका गांधींच्या एका विधानामुळे त्या वादात सापडण्याची शक्यता आहे. इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केली जाते, असा खळबळजनक आरोप मनेका गांधींनी केला आहे. त्यांचे हे आरोप चर्चेत आले असून त्यावर खुद्द ISKCON ट्रस्टनं सविस्तर उत्तर दिलं असून मनेका गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात इस्कॉनचे युधिष्ठिर गोविंद दास यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या मनेका गांधी?

मनेका गांधींच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. “मी तुम्हाला सांगते. देशातले सर्वात मोठे विश्वासघातकी कुणी असेल तर ते इस्कॉन आहे. ते गौशाला ठेवतात, त्याबदल्यात सरकारकडून बरेच फायदे मिळतात. मी हल्लीच त्यांच्या अनंतपूर गौशाळेत गेले होते. तिथे एकही साधी गाय नव्हती. सर्व दुभत्या गाई होत्या. तिथे एकही वासरू नव्हतं. याचा अर्थ सगळे विकले. ISKCON आपल्या सर्व गायी कत्तलखान्यात विकते. हेच रस्तोरस्ती हरे राम, हरे कृष्णा करत फिरत असतात. दूध-दूध म्हणत असतात. पण जेवढ्या गायी यांनी खाटिकांना विकल्या असतील, त्या कदाचित इतर कुणी विकल्या नसतील. जर हे असं करू शकतात, तर इतरांबद्दल काय बोलायचं?” असा आरोप मनेका गांधींनी केला आहे.

“सिद्धपुरुष मासे खाईल का?”, विवेकानंदांविषयी अमोघ लिला दास यांची वादग्रस्त टिपण्णी; ISKCON ने केली ‘ही’ कारवाई

ISKCON चं उत्तर…

दरम्यान, मनेका गांधी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर इस्कॉनकडून त्यावर उत्तर देण्यात आलं आहे. इस्कॉनचे युधिष्ठिर गोविंदं दास यांनी यासंदर्भात एक्सवर सविस्तर पोस्ट केली आहे. “मनेका गांधी यांनी निराधार व चुकीचे आरोप केले आहेत. ISKCON नं गायी व बैलांच्या संरक्षणाचा नेहमीच पुरस्कार केला आहे, त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले आहेत. हे फक्त भारतात नाही, तर जगभरात इस्कॉननं केलं आहे. इस्कॉनमध्ये गायी व बैलांची सेवा केली जाते, त्यांना कत्तलखान्यांत विकलं जात नाही”, अशी पोस्ट युधिष्ठिर गोविंद दास यांनी केली आहे.

या पोस्टसोबत युधिष्ठिर गोविंद दास यांनी इस्कॉनकडून जारी करण्यात आलेलं एक पत्रही शेअर केलं असून त्यामध्ये इस्कॉननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मनेका गांधी या नावाजलेल्या वन्यजीव हक्क संरक्षण कार्यकर्त्या आणि इस्कॉनच्या हितचिंतक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असा आरोप केला जाणं याचं आश्चर्य वाटत आहे”, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iskcon responds bjp mp maneka gandhi allegations cows sold to butchers pmw