जम्मू/श्रीनगर : गेल्या दोन दिवसांत जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरासह विविध घटनांतील मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. त्यापैकी बहुतेक जण वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनात बळी पडले आहेत. बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर मदतकार्याला वेग आला. मुसळधार पावसामुळे झेलम नदीला पूर येऊन, अनंतनाग आणि श्रीनगरमध्ये अनेक निवासी भागांत पाणी शिरले. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत.
जम्मूमध्ये मंगळवार ते बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत विक्रमी ३८० मिमी पावसाची नोंद झाली, जी १९१० मध्ये वेधशाळा स्थापन झाल्यापासून २४ तासांच्या कालावधीतील सर्वाधिक आहे. काश्मीर खोऱ्यातही मंगळवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे झेलम नदीने अनंतनाग जिल्ह्यातील संगम आणि श्रीनगरमधील राम मुन्शी बाग येथे बुधवारी सकाळी पूर इशारा पातळी ओलांडली. जम्मूतून वाहणाऱ्या इतर नद्यांची पाण्याची पातळी बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून कमी होऊ लागली. पुरामुळे अनेक प्रमुख पूल, घरे आणि दुकानांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद आहे. सखल भागांतून १० हजारहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, वैष्णोदेवी मार्गावर मंगळवारी झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. बुधवारी बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह बाहेर काढले. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान २० जण जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कटरा ते वैष्णोदेवी मंदिरापर्यंतच्या १२ किमीच्या मार्गावर अधकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास भूस्खलन झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री अब्दुल्लांकडून परिस्थितीचा आढावा
जम्मूच्या काही भागांत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूत दाखल झाले. त्यांनी या भागातील परिस्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी जम्मूतील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पंतप्रधान मोदींना माहिती दिली. तसेच मदतीच्या आश्वासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘कालच्या तुलनेत आज (बुधवार) पाऊस थांबल्याने आम्हाला थोडासा दिलासा मिळाला आहे. सखल भागात पाणी हळूहळू कमी होत आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
माता वैष्णोदेवी मंदिर मार्गावर झालेल्या भूस्खलनात अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते. मदत आणि बचाव कार्याच्या यशासाठी प्रार्थना करते. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
श्री माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भूस्खलनामुळे झालेली जीवितहानी दुःखद आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांबरोबर आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. प्रशासन सर्व बाधितांना मदत करत आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पाकिस्तानमधील कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये पुराचे पाणी
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात रावी नदीच्या पुराच्या पाण्याने कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये पाणी शिरल्याने १०० हून अधिक लोक अडकल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. गुरुद्वारा दरबार साहिबसह संपूर्ण कर्तारपूर कॉरिडॉर परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. अडकलेल्यांमध्ये बहुतांश कर्तारपूर प्रकल्प व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून, बोटी आणि हेलिकॉप्टरद्वारे त्यांचे बचावकार्य सुरू आहे, असे विभागप्रमुख सैफुल्ला खोकर यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
भारताकडून पाकिस्तानला पूर धोक्याचा इशारा
नवी दिल्ली : उत्तरेकडील राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जम्मूतील तावी नदीला पूर येण्याची शक्यता असून, भारताने पाकिस्तानला सतर्क राहण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. तावी नदी हिमालयातून उगम पावते आणि पाकिस्तानमध्ये चिनाब नदीला मिळते. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाकिस्तानला दिलेला इशारा मानवतावादी दृष्टिकोनातून जारी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. ‘आम्ही काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तावी नदीत पूर येण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा जारी केला.
उधमपूरमध्ये सर्वाधिक ६२९.४ मिमी पाऊस
जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाचे नवे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेआठपासून बुधवारपर्यंत जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात ६२९.४ मिमी पावसाची नोंद झाल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. यापूर्वी जुलै २०१९ मध्ये उधमपूरमध्ये ३४२ मिमी पाऊस झाला होता.
५००० हून अधिक लोकांचे स्थलांतर
– जम्मूतील विविध पूरग्रस्त नदीकिनारी भाग आणि सखल भागांतून ५ हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच जम्मू आणि सांबा जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त नागरिकांपर्यंत अत्यावश्यक मदत पोहोचविण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.
– मुसळधार पावसामुळे जम्मूतील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागांत पाऊस कायम असला तरी त्याची तीव्रता कमी होती. त्यामुळे बचावकार्याने वेग घेतला असून खंडित झालेला पाणीपुरवठा, वीज सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
इंटरनेट सेवा पूर्ववत
श्रीनगर : पुरामुळे ऑप्टिकल फायबरचे मोठे नुकसान झाल्यानंतर बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सर्व फोन आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जम्मूत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे इंटरनेट सेवा खंडित झाली होती, अनेक ठिकाणी फायबरचे नुकसान झाल्याची नोंद झाल्यानंतर तांत्रिक पथकांनी तात्काळ दुरुस्ती काम हाती घेण्यात आले. इंटरनेट सेवा खंडित झाल्याने बँकिंग सेवांमध्येही व्यत्यय आला होता.