पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीला फसवून तिच्यावर एका विकृतानं बसमध्ये बलात्कार केल्याची घटना सध्या चर्चेत आहे. या घटनेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर विचारमंथन होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीनं तिची छेड काढणाऱ्या विकृत व्यक्तीला स्वत:च अद्दल घडवली. एक नाही, दोन नाही तर तब्बल १३ वेळा त्याच्या कानशि‍लात लगावली. हा तरुण नंतर या तरुणीच्या गयावया करत असल्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार कानपूरच्या बेकनगंज मार्केटमधला असल्याचं फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सदर तरुणी बाजारात खरेदीसाठी आली असता संबंधित विकृत तरुण वारंवार तिच्या जवळ जाण्याचा, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. असं करताना हा तरूण या तरुणीला उद्देशून अश्लील शेरेबाजीही करत होता. आधी या तरुणीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर हे प्रकरण अती होत असल्याचं पाहून तरुणीनं उलट फिरून या विकृताला जाब विचारायला सुरुवात केली.

या ‘प्रश्नोत्तरात’ही तरुण उडवाउडवी करत असल्याचं पाहून तरुणीचा पारा चांगलाच चढला. मग तरुणीनं या विकृताचा शर्ट डाव्या हाताने पकडून त्याच्या कानशि‍लात लगावायला सुरुवात केली. हा गोंधळ पाहून आसपासचे लोकही तरुणाला बोलू लागले. एका व्यक्तीनं हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद केला. या व्हिडीओत सदर तरुणी विकृताला कानशि‍लात लगावत असल्याचं दिसत आहे. अवघ्या मिनीटभराच्या वेळात तरुणीनं या विकृताला तब्बल १३ वेळा कानशि‍लात लगावल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

विकृताच्या गयावया, तरुणीचा संताप

शेवटी तरुणीच्या हातचे फटके टाळण्यासाठी हा विकृत उपस्थितांकडे गयावया करू लागला. पण कुणीही त्याला सोडवण्यासाठी पुढे आलं नाही. “मला वाचवा, मी परत असं करणार नाही”, असं हा विकृत म्हणताना दिसत आहे. पण तरुणीनं त्याला मारणं चालूच ठेवल्यामुळे शेवटी तो खाली पडला. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीनेही “तू नेहमीच इतरांना त्रास देतोस, इथे सगळ्यांना तुझा वैताग आला आहे”, असं म्हटल्याचं व्हिडीओच ऐकू येत आहे.

पोलिसांची कारवाई

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत संबंधित विकृताला अटक केली आहे. कानपूर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भातली माहिती देणारा व्हिडीओही शेअर केला आहे.

एकीकडे काही महिला अशा विकृतांच्या शोषणाच्या बळी पडत असताना काही महिला मात्र अशा विकृतांना अद्दल घडवण्यासाठी स्वत: पुढे सरसावत असून स्वसंरक्षणाचा आदर्श घालून देत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur woman viral video slapping eve teaser in market multiple times pmw