President Draupadi Murmu in Karnataka: गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात मराठी व हिंदी भाषेवरून बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. मातृभाषेसोबतच हिंदीचाही आग्रह असायला हवा की नाही? या प्रश्नाभोवती अनेक समर्थनार्थ व विरोधातील भूमिका मांडण्यात आल्या. त्यावेळी इतर राज्यांचा त्यांच्या मातृभाषेबाबतचा आग्रह हा मुद्दाही चर्चेला आला. यासंदर्भातील चर्चांमध्ये आता कर्नाटकचे मु्ख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विचारलेल्या एका प्रश्नाची भर पडली आहे. त्यावर आपण कन्नडच बोलतो अशी पुस्तीही सिद्धरामय्यांनी जोडली. सिद्धरामय्यांच्या या प्रश्नावर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी कर्नाटकच्या मैसूर भागाच्या दौऱ्यावर होत्या. ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ स्पीच अँड हिअरिंग अर्थात AISH या संस्थेच्या ६० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.य यावेळी सिद्धरामय्या यांनी व्यासपीठावरूनच भाषण करताना अचानक थांबून सहजच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘तुम्हाला कन्नड येतं का?’ असा प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नावर राष्ट्रपतींनी नंतर उत्तरही दिलं.
काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?
सिद्धरामय्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रपती म्हणाल्या, “कन्नड ही माझी मातृभाषा नाहीये. पण मी आपल्या देशातल्या सर्व भाषांचा, संस्कृतींचा आणि परंपरांचा सन्मान करते. प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेचं, परंपरांचं, संस्कृतीचं जतन व संवर्धन करावं. माझ्या त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा आहेत. मी हळूहळू कन्नड भाषा शिकण्याचा प्रयत्न करेन”, असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
सिद्धरामय्यांची कन्नड भाषेबाबत आग्रही भूमिका
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबाबत आग्रही भूमिका मांडली होती. “जो कुणी कर्नाटकमध्ये राहात आहे, त्याला कन्नड भाषा बोलता आली पाहिजे. आपण सर्वजण कन्नड आहोत”, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर तेव्हा विरोधकांकडून आक्षेपही घेण्यात आला होता.