Karnataka Congress Leader Heart Attack: कर्नाटक काँग्रेसचे नेते सी. के. रवीचंद्रन यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात होणाऱ्या चौकशीचा विरोध करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रवीचंद्रन हे कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील कुरुबा संघाचे अध्यक्ष होते. सोमवारी पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण सुरू असतानाच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रवीचंद्रन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकारांना संबोधित करत असताना रवीचंद्रन अचानक खुर्चीवरून खाली पडले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हे वाचा >> Sanjoy Roy : “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रवीचंद्रन यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांनी मायक्रोफोन घट्ट धरून ठेवला असल्याचे दिसते. त्यांनी आपल्या मांडीवर मोबाइल ठेवल्याचे दिसत आहे. काही वेळाने मोबाइल मांडीवरून खाली पडतो आणि रवीचंद्रन थोडेसे हबकतात. ते काही सेकंद बोलायचे थांबतात आणि लगेचच खुर्चीवरून खाली कोसळतात. खुर्चीवरून खाली पडल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला बसलेले सहकारी लगेचच त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

रवीचंद्रन हे मुळचे कोलार जिल्ह्यातील चिंतामणी येथील राहणारे आहेत. सध्या ते बंगळुरूमध्ये स्थायिक आहेत. त्यांची एक इंग्रजी शाळा आहे आणि काही काळापूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka congress leader dies of heart attack while addressing press conference in bengaluru kvg