एक्स्प्रेस न्यूज सर्व्हिस

बंगळुरू : कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील मतदाराचे नाव हटवण्यासाठी प्रत्येक अर्जामागे ८० रुपये डेटा सेंटर ऑपरेटरला देण्यात आले, असे कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात आढळून आले आहे.

कर्नाटकमधील २०२३ विधानसभा निवडणुकीआधी आलंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बनावट मतदार हटवण्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या माहितीनुसार, बनावट मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये मोबदला दिला जात होता. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान एकूण ६,०१८ अर्ज करण्यात आले, त्यासाठी सुमारे ४.८ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’चा आरोप करतानाच हा प्रकार उघड केला होता. गेल्या आठवड्यात एसआयटीने याप्रकरणी भाजप नेते सुबोध गुट्टेदार यांच्या संबंधित मालमत्तांवर छापे टाकले. २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेसचे बी.आर. पाटील यांनी गुट्टेदार यांचा पराभव केला होता.

एसआयटीने तपास केल्यानंतर कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरमधून हे सर्व अर्ज पाठवले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्वी स्थानिक पोलीस व नंतर सीआयडी सायबर गुन्हे विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासात मोहम्मद अशफाक नावाच्या स्थानिक व्यक्तीचा सहभाग आढळून आला आहे. २०२३ मध्ये चौकशीनंतर अशफाकने आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करण्याचे आश्वासन दिले व नंतर दुबईला निघून गेला.मतदार यादीतून नाव  वगळण्यासाठी अर्जामागे ८० रुपये आता एसआयटीने त्याचे इंटरनेट कॉल रेकॉर्ड तपासून, त्याचे मोहम्मद अक्रम, जुनैद, असलम आणि नदीम यांच्याशी संपर्क असल्याचे उघड केले आहे. या चौघांच्या मालमत्तांवरही धाड टाकण्यात आली आहे.

 बनावट अर्ज डेटा सेंटरमधून थेट ईसी पोर्टलवर

मोहम्मद अक्रम आणि अशफाक हे डेटा सेंटर चालवत होते तर बाकी डेटा एंट्री ऑपरेटर होते. एसआयटीने  लॅपटॉप जप्त केले असून, त्याचद्वारे मतदार हटवण्याचे अर्ज पाठवण्यात आले होते.

ऑक्टोबर १७ रोजी एसआयटीने भाजप नेते गुट्टेदार, त्यांची दोन मुले हर्षांनंद आणि संतोष, तसेच त्यांचे सीए मल्लिकार्जुन महंतगोल यांच्या मालमत्तांवर छापे टाकले. यामध्ये सातहून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे पैसे कुठून आले याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, गुट्टेदार यांनी आपल्या विरोधातील आरोप फेटाळले असून, बी.आर. पाटील यांनी मंत्रिपदासाठी राहुल गांधींची सहानुभूती मिळवण्यासाठी आरोप केल्याचे सांगितले.

७५ भ्रमणध्वनी क्रमांक बनावट

निवडणूक आयोग पोर्टलवर अर्ज करण्यासाठी ७५ वेगवेगळे भ्रमणध्वनी क्रमांक वापरण्यात आले होते. हे नंबर पोल्ट्री फार्म कामगारांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांचे होते. अर्जातील  मतदारांचे नाव व पत्ता चुकीचा दाखवला गेला होता आणि बऱ्याच मतदारांना त्यांच्या नावावर अर्ज केल्याचे माहितीही नव्हते. आलंदमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत फक्त २४ मतदार हे प्रत्यक्षात मतदार यादीतून हटवण्यायोग्य असल्याचे आढळले, उर्वरित ५,९९४ अर्ज फसवणूक करणारे होते, असेही तपासातून समोर आले आहे.