Khan Sir Appeal To PM Modi To Cancel GST On Education: शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिक्षणावरील १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रद्द करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारणे जीएसटी सूसुत्रीकरणाचेही स्वागत केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खान सर म्हणाले की, “आम्ही पंतप्रधानांना हे देखील कळवू इच्छितो की कोचिंग इस्टिट्यूट्समध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरही १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. माझ्या मते, शिक्षणावर जीएसटी नसावा.”
पण, खान सरांनी यावेळी लक्झरी वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले.
“मला आशा आहे की पुढच्या वेळी, जेव्हा पंतप्रधान लाल किल्ल्यावर भाषण करतील तेव्हा ते यंदा दिवाळीला दिलेल्या भेटीप्रमाणे होळीची भेट देण्याचा विचार करतील. लक्झरी वस्तूंवरील जीएसटी वाढवणे हे एक चांगले पाऊल आहे”, असेही खान सरांनी नमूद केले.
५६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटीचे १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता जीएसटीचे केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन स्लॅब ठेवण्यात आले आहे. याच्या माध्यमातून जीएसटी कर रचनेत सूसुत्रताना आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
याशिवाय, तंबाखू, पान मसाला, सिगारेट, बिडी, साखरयुक्त पेये, ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या उच्च दर्जाच्या मोटारसायकली, लक्झरी कार, नौका आणि हेलिकॉप्टर यासारख्या लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी ४० टक्के कर ठेवण्यात आला आहे.
कोण आहेत खान सर?
सरकारी नोकरी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फैजल खान उर्फ खान सर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या अनोख्या शैलीमुळे खान सरांनी मुलांमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. ते कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगतात की अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या गोष्टी समजू शकतात.
खान सरांनी विज्ञान विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथून त्यांनी एमएससी केले. खान सरांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण परमार मिशन स्कूल, देवरिया, उत्तर प्रदेश येथून पूर्ण केले.