पीटीआय, कोलकाता
कोलकात्यातील विधि महाविद्यालयात विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारपैकी तिघांनी हल्ल्याची पूर्वनियोजित योजना आखली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. दरम्यान, हा तपास सीबीआयतर्फे केला जावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
मोनोजित मिश्रा, प्रतिम मुखर्जी आणि झैद अहमद हे तिघे आरोपी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे नऊ सदस्यांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघा आरोपींनी त्यांच्याकडील मोबाइलमध्ये अत्याचाराचे चित्रीकरण करत होते. नंतर पीडितांना त्रास देण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर केला जात होता. हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित होता. तिघेही गेल्या अनेक दिवसांपासून कट रचत होते. मुख्य आरोपी पीडितेने महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासूनच तिला त्रास देत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजप आणि डाव्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
तृणमूल काँग्रेसच्या तथ्यशोध पथकातील चार सदस्यांनी कथित सामूहिक अत्याचाराच्या ठिकाणाची सोमवारी पाहणी केली. याच दरम्यान, महाविद्यालयाबाहेर भाजप, ‘भाजयुमो’चे पदाधिकारी आणि डाव्या तसेच त्यांच्या सहयोगी संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यामध्ये संघर्ष झाला.
मुख्य आरोपीवर लैंगिक छळाचा गुन्हा
अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा एक गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि हिंसक गुन्ह्यांचे अनेक खटले प्रलंबित आहेत, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.