Kolkata Rape Case protesting doctors demands : कोलकाता येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपीला कठोर शासन व्हावं यासह इतर काही मागण्या घेऊन पश्चिम बंगालमधील सरकारी डॉक्टर संपावर गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, या डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता डॉक्टर त्यांचं आंदोलन मागे घेणार याकडे सरकारचं लक्ष लागलं आहे. आंदोलक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने सोमवारी रात्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टरांचं शिष्टमंडळ व मुख्यमंत्र्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर ममता बॅनर्जी सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक व आरोग्य सेवा संचालकांना त्यांच्या पदावरून हटवलं आहे. तसेच बलात्कार-हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी नवी समिती स्थापन केली जाणार आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की मंगळवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत कोलकात्याचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना त्यांच्या पदावरून हटवलं जाईल. गोयल यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त पदभार स्वीकारतील. यासह मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर इतरही अनेक बदल केले जातील. डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने ममता बॅनर्जी यांच्याकडे पाच मागण्या मांडल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी ज्यापैकी तीन मागण्या मान्य केल्या आहेत.

हे ही वाचा >> Kolkata Rape and Murder : कोलकाता रुग्णालयातले आंदोलक डॉक्टर आणि ममता बॅनर्जी यांच्यात दोन तास बैठक, नेमकं काय घडलं?

आंदोलन चालूच राहणार

दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने आंदोलक डॉक्टरांच्या पाचपैकी तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या असल्या तरी डॉक्टर त्यांचं आंदोलन चालूच ठेवणार आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतर, ममता बॅनर्जींना आश्वासन दिल्यानंतर आंदोलक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत. कारण आमच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या नाहीत.

हे ही वाचा >> इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी; परराष्ट्र मंत्रालयानेही सुनावले खडे बोल; म्हणाले…

पोलीस आयुक्त आज राजीनामा देणार

दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, कोलकाता पोलीस उपायुक्तांनाही त्यांच्या पदावरून हटवलं जाईल. त्यांच्यावर पीडित कुटुंबाला पैशाचं अमिष दाखवून आंदोलन थांबवण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या मागण्या पाहता कोलकात्याचे पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल म्हणाले होते की ते त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत. आज सायंकाळी चार वाजता गोयल त्यांचा राजीनामा सादर करतील.

हे ही वाचा >> Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान?

आंदोलकांवर कारवाई होणार नाही : बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आंदोलक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाबरोबर सकारात्मक चर्चा झाली. डॉक्टरांनी पाच मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी तीन मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. तसेच आम्ही डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलक डॉक्टरांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याचं त्यांना सांगितलं आहे”.