पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असताना, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी समग्र शिक्षा योजनेंतर्गत (SSA) तमिळनाडूसाठी रखडलेल्या २,१५२ कोटी रुपयांच्या निधीसाठी केंद्राच्या हस्तक्षेपाची पुन्हा मागणी केली. तसेच, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत प्रस्तावित त्रिभाषा धोरणाबाबत तमिळनाडू सरकारचे स्पष्ट आणि विरोधात्मक मत पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे की, २०२४-२५ साठीचा २,१५१.५९ कोटी रुपयांचा केंद्रीय निधी आणि २०२५-२६ या वर्षासाठीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात यावा. मात्र, हे करताना तमिळनाडू राज्यावर कोणताही बंधनकारक करार अथवा अटी लादल्या जाऊ नयेत.

समग्र शिक्षा निधी हा शालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या मुख्य योजनांपैकी एक असून, त्याअंतर्गत देशभरातील शाळांना आधार दिला जातो. २०२२ मध्ये सुरू झालेल्या पीएम श्री योजनेचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०चे तत्त्व आत्मसात करणाऱ्या १४,५०० शाळांना “आदर्श शाळा” म्हणून विकसित करून, इतर शाळांसाठी मार्गदर्शक ठरवणे हा आहे.

२१ जुलै रोजी तब्येत बिघडल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना चक्कर आल्याची तक्रार झाल्यानंतर चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत, राज्याचे अर्थमंत्री थंगम थेनारासू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्टॅलिन यांचे पत्र वैयक्तिकरीत्या सुपूर्द केले.

पंतप्रधान मोदी रविवारी तिरुचिरापल्ली येथे राजा राजेंद्र चोल-१ यांच्या जयंतीनिमित्त गंगाईकोंडा चोलापुरम येथे होणाऱ्या आदि तिरुवतीराई महोत्सवात सहभागी होण्यासाठी आले आहेत.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी निवेदनात स्पष्ट केले की, केंद्र सरकारकडून आवश्यक निधी मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. ते म्हणाले की, तमिळनाडूने अनेक दशकांपासून चालत आलेल्या तमीळ आणि इंग्रजी या द्विभाषिक शिक्षण धोरणाला राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्र मान्य नाही.
त्याशिवाय स्टॅलिन यांनी कोइम्बतूर आणि मदुराई मेट्रो प्रकल्पांना ५०:५० च्या आर्थिक वाटा तत्त्वावर मंजुरी देण्याची मागणी केली.
निवेदनात त्यांनी श्रीलंकेकडून वारंवार होणाऱ्या भारतीय मच्छीमारांच्या अटकेकडेही केंद्राचे लक्ष वेधले. तसेच सध्या श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या मच्छीमारांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी, यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली.

चोल साम्राज्याच्या वारशाला दिला सन्मान

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या गंगाईकोंडा चोलापुरम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत ते रोड शो करत जनतेशी संवाद साधण्याची शक्यता असून, यावेळी ते पौराणिक चोल सम्राटांच्या सन्मानार्थ एक विशेष स्मारक नाणे जारी करणार आहेत.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) चोल साम्राज्याच्या शैव परंपरा आणि भव्य मंदिर स्थापत्यकलेवर आधारित विशेष प्रदर्शने आयोजित केली आहेत. या प्रदर्शनांबरोबरच हेरिटेज वॉक आणि मार्गदर्शित फेरफटकादेखील आयोजित करण्यात आला असून, त्यामधून त्या काळातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दुर्मीळ दर्शन घडणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीतकार इलयाराजा यांच्या नेतृत्वाखाली तिरुवासगम येथे एक विशेष संगीत मैफील होणार असून, ते या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रमाला तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, अर्थमंत्री थेनारासु, हिंदू धार्मिक व धर्मादाय निधी मंत्री पी के. शेखर बाबू, वाहतूक मंत्री एस. एस. शिवशंकर, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.