अवघ्या काही महिन्यांत कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपा आमदारपुत्राला तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. विशेष म्हणजे ही लाच स्वीकारण्याचं काम थेट आमदारांच्या कार्यालयातच चालू होतं. ही लाच आमदार महोदयांसाठीच स्वीकारली जात असल्याचाही दावा केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घडलं काय?

कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजपा आमदार के मडल विरुपक्षप्पा यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत लाच स्वीकारणार असल्याची माहिती मिळताच लोकायुक्त पोलिसांनी थेट विरूपक्षप्पा यांच्या कार्यालयात धाड टाकली आणि प्रशांत यांना रंगेहाथ अटक केली. तसेच, यानंतर प्रशांत यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ६ कोटींचं घबाड सापडलं आहे.

व्ही प्रशांत मडल हे बंगळुरू पाणी पुरवठा विभागात मुख्य अकाऊंटंट म्हणून काम करतात. ज्या व्यक्तीकडे त्यांनी लाच मागितली होती, त्याच व्यक्तीने प्रशांत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्त पोलिसांनी क्रेसेंट रोडवरील विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी प्रशांत ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आले.

८१ लाखांची मागितली होती लाच!

दरम्यान, प्रशांत यांनी तक्रारदाराकडून ८१ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ४० लाख रुपये तक्रारदार प्रशांत यांना देत असताना लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांचे वडील अर्थात भाजपा आमदार विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप अँड डिटर्जेंट लिमिटेडचे संचालक असून घेतली जाणारी लाच त्यांच्याच नावाने घेतली जात होती.

‘यूपी में का बा?’… एका गाण्यावरून इतके…?

कार्यालयात सव्वा कोटी, तर घरात ६ कोटींचं घबाड!

लोकायुक्त पोलिसांनी लागलीच विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयाची झडती घेऊन तिथून १ लाख २० कोटी रुपये रोख ताब्यात घेतले. त्यानंतर प्रशांत यांच्या घरीही पोलिसांनी छापा टाकून तब्बल ६ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत यांना अटक केली असून त्यांची चौकशी चालू आहे. विशेष म्हणजे प्रशांत हे याआधी एसीबीसह आर्थिक सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. एसीबीनंतर प्रशांत यांनी लोकायुक्तमध्येही काम मिळावे, यासाठी प्रयत्न केले असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokayukta police arrested karnataka bjp mla son for 40 lakh bribe pmw