महाराष्ट्रातील काँग्रेसचे बहुतांश नेते कोणत्याही परिस्थितीत सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत. जर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं नाही तर आपल्या राज्यातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असं मत राज्यातील काही बड्या नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केलं. सोमवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यावर जोर दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या राज्यातील अस्तित्वाच्या लढाईत काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी होणं आवश्यक असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं.
सोमवारी पार पडलेल्या या बैठकीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आणि रजनी पाटील यांसारख्या दिग्गजांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी सरकार स्थापन करण्याच्या सुचना केल्या. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. निवडणुकांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक दिग्गजांनी रामराम ठोकला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला आपल्या हातून जाऊ देऊ नये. काँग्रेसनं सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे, असही या बैठकीत ठरवण्यात आलं.
काँग्रेसच्या ज्या उमेदवारांना निवडणुकीत यश मिळालं आहे, त्यांना सहकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. आपली प्रतीमा आणि आपल्याच हिंमतीवर निवडणूक जिंकण्यावर यशस्वी ठरल्याचं त्यांची धारणा असल्याचंही या बैठकीत सोनिया गांधी यांच्यासमोर सांगण्यात आलं. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यावर अनेक आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परंतु पक्षाचे काही वरिष्ठ नेते याविरोधात आहेत. यामध्ये ए.के.अँटनी, मुकुल वासनिक आणि शिवराज पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी शिवसेनेसोबत आघाडीसाठी आपलं मत व्यक्त केलं. शिवसेनेच्या आक्रमक प्रतीमेमुळे आपल्याला दुसऱ्या राज्यांमध्ये नुकसान सोसावं लागू शकतं, असं मत त्यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केलं.
