Vande Bharat Express Service : अलिशान, आरामदायी प्रवास देण्याकरता भारतात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. मेक इन इंडियाअंतर्गत बनवण्यात आलेल्या या नवतंत्रज्ञानयुक्त ट्रेनमधून प्रवास करण्यास भारतातील अनेक प्रवासी उत्सुक आहेत. या एक्स्प्रेसमधील मिळणारी सुविधा उच्च दर्जाची असल्याने याचे तिकिट दरही जास्त असते. वंदे भारत नजिकच्या स्थानकातून जाणार असेल तर प्रवासी ट्रेन पाहण्यासाठी फलाटावर गर्दी करतात. अशातच, या ट्रेनच्या नावाखाली दुसऱ्याच ट्रेनची सेवा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आलिशान वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करण्याचं स्वप्न भंग पावलं”, असा दावा एका व्यक्तीनं केला आहे. वंदे भारतचे बुकींग केलेले असतानाही निकृष्ट सेवा असलेली वेगळ्या ट्रेनची सेवा दिल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. सिद्धार्थ पांडे नावाच्या व्यक्तीने भारतीय रेल्वे आणि मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत ट्विटरवर आपला अनुभव शेअर केला आहे. पांडे यांनी ट्रेनच्या आतील फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या ट्वीटला रेल्वेकडून उत्तरही मिळालं आहे.

सिद्धार्थ पांडे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “मी पहिल्यांदाच वंदे भारतने प्रवास करणार असल्याने आनंदित होतो. पण वंदे भारतच्या नावाने दुसरी ट्रेन पाहून धक्का बसला. शौचालयाची दुरवस्था झाली आहे. इतर सेवाही सर्वात वाईट आहेत. तरीही वंदे भारतच्या तिकिट दरानुसार भाडे आकारले जाते.”

१० जून रोजी सिद्धार्थ पांडे २२४३९ क्रमांकाच्या वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करत होता. ही ट्रेन नवी दिल्लीहून काटराच्या दिशेने जात होती. या प्रवासासाठी त्याने वंदे भारतची तिकिट काढली होती. परंतु, वंदे भारतच्या तिकिटाचे पैसे भरूनही त्यांना दुसरी ट्रेन मिळाली. या ट्रेनमध्ये शौचालयांची दुरवस्था झाली होती. सिद्धार्थने यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ही तेजस एक्स्प्रेस होती.

त्याने ट्वीट करताच त्यावर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. कॉमेंटनुसार, असे प्रकार अनेकदा होत असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे. तसंच, काही प्रवाशांमुळे ट्रेन अस्वच्छ होत असल्याचंही नेटिझन्सने म्हटलं आहे. तसंच, आपत्कालीन परिस्थिती कधी कधी वंदे भारतच्या जागेवर तेजस एक्स्प्रेसही चालवली जाते, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. दरम्यान, रेल्वे विभागानेही सिद्धार्थच्या पोस्टची दखल घेतली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man claims booked vande bharat ticket but travelled in tejas train with worst services sgk