मणिपूरमध्ये ४४ आमदार सरकार स्थापनेसाठी तयार आहेत असा दावा भाजपचे आमदार थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी केला. सिंह यांच्यासह भाजपच्या नऊ इतर आमदारांनी राजभवनामध्ये जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मणिपूरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट आहे.

थोकचोम राधेश्याम सिंह म्हणाले की, ‘‘जनतेच्या इच्छेनुसार सरकार स्थापनेसाठी ४४ आमदार तयार आहेत. आम्ही ही गोष्ट राज्यपालांना कळवली आहे. त्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावरही आम्ही चर्चा केली. राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि जनतेच्या सर्वोत्तम हितासाठी योग्य ती कार्यवाहीसाठी पुढाकार घेऊ असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे.’’ मात्र, सरकार स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सरकार नसल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सिंह यांनी सांगितले. पूर्वीच्या कार्यकाळात दोन वर्षे कोविडमुळे वाया गेली आणि या कार्यकाळात संघर्षामुळे आणखी दोन वर्षे वाया गेली असे ते म्हणाले. मणिपूरच्या विधानसभेचे एकूण संख्याबळ ६० इतके असून सभागृहाचे सध्या ५९ सदस्य आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे ३२ मैतेई आमदारांसह एकूण ४४ आमदार आहेत.

केंद्रीय नेतृत्व मात्र अनुत्सुक

दरम्यान, आमदारांनी राज्यपालांची केवळ सदिच्छा भेट घेतली असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. सध्या राज्यातील संथगतीने सुरू असलेली शांतता प्रक्रिया योग्य मार्गावर असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. सध्या सरकार स्थापनेसाठी कोणतेही प्रयत्न केल्यास मतभेद पुन्हा उफाळून येतील आणि शांतता प्रक्रियेत अडथळे येतील असे केंद्रीय नेतृत्वाचे मत असल्याचे सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. भाजपचे नेतृत्व किंवा केंद्र सरकारचे सध्याचे ध्येय राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे आहे, सरकार स्थापन करणे नव्हे, अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

आम्ही सरकार स्थापनेसाठी तयार आहोत हे सरकार स्थापनेचा दावा करण्यासारखेच आहे. अध्यक्ष सत्यब्रत यांनी स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे ४४ आमदारांची भेट घेतली आहे. नवीन सरकारला कोणाचाही विरोध नाही – थोकचोम राधेश्याम सिंह, भाजप आमदार