मणिपूरमधला महिलांची विविस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या प्रश्नावरुन मोदी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अश्रू हे मगरीचे अश्रू असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ७७ दिवस मोदी शांत का बसले? असा प्रश्न विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे प्रियंका गांधींनी?

“दोन महिन्यांपासून मणिपूर पेटलं आहे. घरं जाळली जात आहेत. लोक एकमेकांचा जीव घेत आहेत. महिलांवर भयंकर अत्याचार होत आहेत. मुलांना घरं राहिली नाहीत. मात्र आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ७७ दिवस गप्प बसले होते. तिथे कारवाई करणं तर सोडाच मणिपूरचा म पण उच्चारला नाही. गुरुवारी मात्र त्यांनी नाईलाजाने एक वक्तव्य केलं. कारण एक भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे नाईलाजाने पंतप्रधान बोलले. त्यातही राजकारण आणलं. जे वाक्य बोलले त्यात त्या राज्यांची नावं घेतली जिथे विरोधी सरकार आहे.” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे.

हे पण वाचा- “मगरीचे अश्रू आता…”, मणिपूर घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर संजय राऊतांचा संताप

मी आज तुम्हाला विचारु इच्छितो जनआक्रोश लिहिलं आहे तो कुठला आहे, ते तुमचाच आहे. मी इथे जनतेच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आले आहे. आज महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा आहे. मी फक्त भाजीपाला, फळं, धान्य या गोष्टींविषयी बोलत नाही. सगळ्याच गोष्टी बोलते आहे. तुम्हाला घर दुरुस्त करायचं आहे तर मजुरी महागली आहे. शाळांची फी भरणं महाग झालं आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यावर महागाईचं ओझं लादलं जातं आहे असंही यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. ग्वाल्हेर मध्ये त्या काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होत्या.

काय आहे प्रकरण?

बुधवारी रात्री (१९ जुलै) सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला.

हे पण वाचा- Manipur : “बंदुकीच्या धाकावर पत्नीला विवस्त्र केलं, नाचवलं आणि..”, कारगील युद्धात लढलेल्या सैनिकाची आपबिती

ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येते. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय २०; तर दुसरीचे वय ४० असल्याचे कळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत विदारक परिस्थिती विशद करणारा असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पुरुषांचा जमाव या महिलांना बळजबरीने शेतात नेत असताना त्यांच्या शरीराची विटंबना करताना दिसतो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur is burning pm statement on it came after 77 days says priyanka gandhi in mp gwalior scj