Mehbooba Mufti : भारतीयांशी लग्न केलेल्या आणि अनेक वर्षांपासून येथे राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असे आवाहन पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी सरकारला केले. तसंच, गृहमंत्रालयाने त्यांच्याप्रती दयाळू दृष्टीकोन दाखवायला हवा, असंही त्या म्हणाल्या. आधी त्यांनी एक्स पोस्टद्वारे सरकारकडे विनंती केली, त्यानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरकारला साकडे घातले आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “हा खूप मोठा हल्ला असून यात अनेक निष्पाप लोक मारले गेले. यामुळे वातावरण बदललं गेलं आहे. अशा परिस्थिती काही गोष्टी अशा घडतात ज्याची अपेक्षाही केलेली नसते. काश्मिरींकडे ज्या पद्धतीने पाहिलं जायचं, ते आता कमी झालं आहे. काश्मिरींवर कारवाई झाली. पहलगाम हल्ल्यानतंर अनेकांना पकडलं गेलं, दहशतवाद्यांची घरे पाडली. यात अनेक सामान्य नागरिकांचीही घरे पडली. एका घरात तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यामुळे गृहमंत्रालयाला माझी विनंती आहे की दहशतवाद्यांबरोबर जो व्यवहार केला जातोय, तसा व्यवहार सामान्य नागरिकांबरोबर होऊ नये.”
“काही लोक पाकिस्तानातून येथे आले आहेत. अशा काही महिला आहेत ज्यांचे लग्न ३०-४० वर्षांपूर्वी भारतात झालंय. त्यांचं घर हिंदुस्तान आहे. त्यांना आता नातवंडं झाली आहेत. ते स्वतःला हिंदुस्तानी समजतात, ते या वयात कुठे जातील? गृहमंत्रालयाने त्यांच्याकडे दयाळू वृत्तीने पाहिलं पाहिजे. कराण, ते स्वतःला हिंदुस्तानी समजतात, पाकिस्तानी नाही.”
एक्सवरील पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, भारतातून सर्व पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याच्या सरकारने अलिकडेच दिलेल्या निर्देशामुळे गंभीर मानवीय चिंता निर्माण झाल्या आहेत, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये. यापैकी अनेक महिला अशा आहेत ज्या ३०-४० वर्षांपूर्वी भारतात आल्या होत्या, ज्यांनी भारतीय नागरिकांशी लग्न केले आहे, कुटुंबे वाढवली आहेत आणि दीर्घकाळ आपल्या समाजाचा भाग आहेत.”
“आम्ही सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आणि महिला, मुले आणि वृद्धांबाबत दयाळू दृष्टिकोन स्वीकारण्याची विनंती करतो. भारतात अनेक दशकांपासून शांततेत राहणाऱ्या व्यक्तींना हद्दपार करणे केवळ अमानवीयच नाही तर ज्या कुटुंबांना आता दुसरे घर नाही त्यांना त्रास देण्यासारखे आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.