Mehli Mistry Exit Note Quotes Ratan Tata : भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैंकी एक असलेल्या टाटा समूहात सध्या मोठी उलथापालथ चालू आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे मेहली मिस्त्री यांची टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळातून २८ ऑक्टोबर रोजी हकालपट्टी झाली. त्यानंतर मिस्त्री यांनी देखील समूहाशी नातं तोडून टाकलं आहे. टाटा समूहातून बाहेर पडताना त्यांनी टाटा ट्र्स्टचे चेअरमन नोएल टाटा यांच्यासह इतर विश्वस्तांना एक पत्र (एक्झिट नोट) पाठवलं आहे.
एक्झिट नोटमध्ये मिस्त्री यांनी म्हटलं आहे की “रतन टाटांचं म्हणणं होतं की टाटा ट्रस्ट कधीही कोणत्याही वादात अडकू नये, तसेच कोणताही वाद वाढल्याने ट्रस्टची प्रतिष्ठा खराब होईल.”
मेहली मिस्त्रींचं भावनिक पत्र
मेहली मिस्त्री म्हणाले, “रतन टाटा यांनी नेहमीच सार्वजनिक हिताला प्राधान्य दिलं आणि मला मनापासून आशा आहे की भविष्यातही टाटा ट्र्स्टचे विश्वस्त त्याच मार्गाने चालतील. संस्थेतील कोणतीही व्यक्ती ही या संस्थेपेक्षा मोठी नाही.
या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी मिस्त्री यांचा टाटा ट्र्स्टमधील विश्वस्त म्हणून कार्यकाळ संपला. गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर रोजी टाटा ट्र्स्टच्या विश्वस्त मंडळाने केलेल्या ठरावानुसार मिस्त्री यांची आजीवन विश्वस्त म्हणून नियुक्ती केली जाणार होती. मात्र, तीन विश्वस्तांनी त्यांच्या नावाला मान्यता न दिल्याने मिस्त्री यांची पुनर्नियुक्ती झाली नाही.
मेहली मिस्त्री कायदेशीर लढाईच्या तयारीत
टाटा ट्रस्टमधील हकालपट्टीनंतर मेहली मिस्त्री यांनी आता कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी मुंबईमधील धर्मादाय आयुक्तांकडे विश्वस्तांच्या विरोधात ‘कॅव्हेट’ दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता टाटा ट्रस्ट आणि मेहली मिस्त्री यांच्यातील वाद आणखी चिघळू शकतो.
कोण आहेत मेहली मिस्त्री?
मेहली मिस्त्री हे दिवंगत सायरस मिस्त्री यांचे मावसबंधू आहेत. शापूरजी पालनजी उद्योगसमूहाची मालकी असलेल्या कुटुंबाशी निगडित असूनही मेहली मिस्त्री यांनी एम. पालनजी या कंपनीच्या माध्यमातून वेगळी वाट चोखाळली. औद्योगिक रंगकाम, जलखोदाई, जहाजबांधणी, मालवाहतूक, वाहन वितरण, विमा अशा क्षेत्रांमध्ये एम. पालनजी समूह कार्यरत आहे. त्यांचे आणि रतन टाटा यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. रतन टाटांना ते प्रेरक (मेंटॉर) मानत. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या अलिबागमधील बंगल्याचा ताबा मेहली मिस्त्रींकडे आला.
