“आमच्यावर सक्तीने…”, वंदे मातरम गाण्यानं अधिवेशनाची सांगता करण्यावर एमआयएमच्या सदस्यांचा तीव्र आक्षेप!

वंदे मातरम गाण्याने हिवाळी अधिवेशनाची सांगता करण्यावर एमआयएमच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. यावरून बिहारच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे.

mim mla akhtarul iman
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत आमदार अख्तरुल इमान (संग्रहीत छायाचित्र)

भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांवरून सामाजिक तेढ निर्माण झाल्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, आता या मुद्द्यावरून अधिवेशनामध्ये देखील लोकप्रतिनिधींमध्ये आमने-सामने खडाजंगी झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये एमआयएम आणि भाजपा या दोन पक्षांचे लोकप्रतिनिधी समोरासमोर होते. यावेळी एमआयएमच्या सदस्यांनी वंदे मातरमने अधिवेशनाची सांगता करण्यावर तीव्र आक्षेप घेतला असताना भाजपाच्या सदस्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. बिहारच्या विधानसभेमध्ये शुक्रवारी हा प्रकार घडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शुक्रवारी बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. यावेळी वंदे मातरम या गीताने अधिवेशनाची सांगता होण्यावर असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाच्या आमदारांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. “हे आमच्यावर जबरदस्तीने थोपवलं जात आहे. संविधानात असं काहीही लिहिलेलं नाही. हे आमच्या परंपरांच्या विरोधी आहे आधीही राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान होतं. पण सदनाच्या आत ते कधीच गायलं गेलं नाही. एक नवी परंपरा सुरू केली गेली आहे, जिची काहीही आवश्यकता नव्हती”, अशा शब्दांत एमआयएमचे आमदार अख्तरुल ईमान यांनी आक्षेप नोंदवला.

संविधानात सर्वच धर्मांचा आदर करण्याचा उल्लेख

दरम्यान, यावेळी आपला आक्षेप नोंदवताना त्यांनी संविधानाचाही संदर्भ दिला. “देशाच्या संविधानात प्रेम आणि बंधुभाव आहे. तिथे सर्व धर्मांचा सन्मान करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच मी वंदे मातरम गात नाही आणि कधीच गाणार नाही. पण यामुळे आमच्या देशभक्तीवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. आमची देशावर निष्ठा आहे आणि कुणीही आमच्यावर वंदे मातरम गाण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही”, असं ईमान यावेळी म्हणाले.

“अब्बाजान, चचाजानच्या अनुयायांना मी सांगून ठेवतो की…”, योगी आदित्यनाथ यांचा ओवैसींना इशारा!

“हा तर तालिबानी विचार”

दरम्यान, एमआयएमच्या आमदारांनी सभागृहात वंदे मातरम गाण्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. “एमआयएमच्या आमदारांचा हा विचार तालिबानी पद्धतीचा आहे. त्यांना या देशाला देखील तालिबान बनवायचं आहे. जिहादी आणि जातीवादी व्यक्तीकडून यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवताही येणार नाही. त्यांचं ना या देशावर प्रेम आहे आणि ना या देशाच्या परंपरांवर”, अशी टीका भाजपाचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mim mla objects on closer of bihar assembly session with vande mataram song pmw

Next Story
“तुम्ही खूप सुंदर दिसता पण…”; बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भाजपाच्या महिला आमदारावर आक्षेपार्ह टिप्पणी; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी