बीजिंग : शांघाय सहकार्य संघटनेची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनमधील तिआंजिन येथे होणार असून, या संघटनेची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी बैठक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेदेखील या बैठकीला उपस्थित असतील.

चीनचे सहायक परराष्ट्रमंत्री लिऊ बिन यांनी माध्यमांना ही माहिती दिली. तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप अर्दोगन, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, मालदीवचे अध्यक्ष महंमद मुईझ्झू यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील. याखेरीज १० आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी उपस्थित असतील. यात संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस, शांघाय सहकार्य संघटनेचे सरचिटणीस नुर्लन येरमेक्बायेव्ह उपस्थित असतील.

शांघाय सहकार्य संघटनेत रशिया, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस, चीन या देशांचा समावेश आहे. संघटनेच्या बैठकीला उपस्थित असणारे अनेक नेते ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विजय दिनानिमित्त संचलानाही उपस्थित राहणार आहेत.

वाँग यी-मुनिर यांची भेट इस्लामाबाद: चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी शुक्रवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनिर यांची भेट घेतली. प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी लढा आणि द्विस्तरावरील संबंधांवर चर्चा केली. वाँग यी इस्लामाबादमध्ये सहाव्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेसाठी आले आहेत. त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचीही भेट घेतली. पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि विकासाला चीनने या वेळी पूर्ण पाठिंबा दिला.