“मोदीजी, तुम्ही लखीमपूर खेरीला जाल ना?”; लखनऊ दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधानांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनऊच्या दौऱ्यावर असून अनेक प्रकल्पांची ते घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आलाय.

lakhimpur kheri
मोदी आज एका दिवसाच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. (प्रातिनिधिक फोटो)

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा बळी गेल्यामुळे सोमवारी देशभरात तीव्र पडसाद उमटले. मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी लखीमपूर खेरीकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीतापूर येथे रोखले. तेथे त्या आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झडली. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं असल्याचं सांगत प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले.

“कोणतेही आदेश नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना का अटक केली जात आहे. या उलट ज्याने हा गुन्हा केलाय त्याला अटक करण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी त्या व्यक्तीला अटक करा आमच्यासारख्यांना नाही,” असं प्रियंका यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. सितापूरमधील शासकीय विश्रामगृहामधून त्यांनी ही मुलाखत दिली. येथे प्रियंका यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. आजादी का अमृतमोहोत्सव या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनऊच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमामध्ये मोदी अनेक सर्वजनिक उपक्रमांचं, प्रकल्पांचं उद्घाटन तसेच घोषणा करणार आहेत.

“मोजीदी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी येत आहे. आपल्याला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं. शेतकऱ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लखनऊमध्ये हा कार्यक्रम घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या मंत्र्याला पदावरुन दूर करत त्याला मुलाला अटक का नाही करत? हा नेता पदावर कायम राहिला तर सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय,” अशा शब्दांमध्ये प्रियंका यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच मोदीजी तुम्ही लखीमपूर खेरीला जाणार आहात ना?, असा प्रश्नही प्रियंका यांनी विचारलाय.

दरम्यान प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारला आहे. “नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या २८ तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदाताला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही. का?,” अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये त्या दिवशी झालेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. योगी सरकारला हिंसाचार प्रकरण दडपून टाकायचे आहे, असा आरोप काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केला. लखीमपूर खेरीमधील हिंसाचार हा शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या केलेली हत्या असल्याचा आरोप काँग्रेसने केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करावी, त्यांच्या मुलाला अटक करावी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदींनी केली. 

विरोधकांचा हल्लाबोल

उत्तर प्रदेशात रामराज्याऐवजी खुन्यांचे राज्य असल्याची टीका तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केली, तर योगी सरकार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारा ‘जनरल डायर’ आहे, असा आरोप काँग्रेसचे रणदिप सुरजेवाला यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आम आदमी पक्षाने केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी केली. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचारावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्ष शेतकरी आंदोलनाआडून राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपाने केला. हिंसाचार घडवण्यात समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते सामील होते, असा आरोप भाजपच्या ‘आयटी’ सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला.

घडलं काय?

लखीमपूर खेरी येथे रविवारी केंद्रीयमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमाआधी घडलेल्या हिंसाचारात चार आंदोलक शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावात मोटारी घुसवल्यामुळे चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हिंसाचार उफाळला. यापैकी एक मोटार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशीष मिश्रा यांची होती, असा आरोप आहे. त्यामुळे त्याच्यासह अनेकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हिंसाचार घडला तेव्हा आपण आणि आपले पुत्र घटनास्थळी नव्हतो, असा दावा केंद्रीयमंत्री मिश्रा यांनी केला आहे. परंतु आंदोलक शेतकऱ्यांच्या जथ्यात घुसवलेल्या मोटारींपैकी एक मोटार केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यातील होती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मृतांना मदत जाहीर

हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची आणि मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली. चार शेतक ऱ्यांना भरपाई देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास स्थानिक पातळीवर नोकरी देण्यात येईल, असे राज्याच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले.

इतरांवरही होणार कारवाई

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी- वढेरा मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीतापूर येथे अडवले. ‘‘अटकेचा वॉरंट दाखवावा आणि कोणत्या आधारावर ताब्यात घेण्यात येत आहे, त्याचे स्पष्टीकरण द्यावे, त्याशिवाय अटक करू देणार नाही’’, असा पवित्रा प्रियांका यांनी घेतला. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उपोषण सुरू केले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यास निघाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेरच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या कार्यकत्र्यांनी पोलिसांचे वाहन जाळले. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आदित्यनाथ यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Modiji will you go to lakhimpur kheri priyanka gandhi arrested asks scsg

Next Story
प्रियांका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच बंद केलं फेसबुक -व्हॉट्सअ‍ॅप! काँग्रेस खासदाराचा दावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी