राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. तसेच सुभाषचंद्रांकडे काँग्रेसचं बहुमत होतं. ते गांधीजींसोबत भांडू शकले असते, पण त्यांनी भांडण केलं नाही, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. ते मणिपूरची राजधानी इंफाळमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलताना स्वातंत्र्य काळातील काँग्रेसच्या अध्यक्षपदाविषयीची ही घटना सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन भागवत म्हणाले, “सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. काहीतरी कारण असेल, पण माहिती नाही. गांधीजींची यासाठी तयारी नव्हती. गांधीजी आणि सुभाषचंद्र यांच्यात वाद होता. मात्र, सुभाषचंद्र बोस यांच्याकडे बहुमत होतं. यावरून ते भांडू शकले असते, मात्र त्यांनी भांडण केलं नाही. त्यांनी माघार घेतली. कारण त्यांना इंग्रजांसोबत लढायचं होतं. यासाठी देशाला एक होणं गरजेचं होतं. माझं तुझं असे छोटे स्वार्थ विसरणं गरजेचं होतं.”

” देशातील लोकांसोबत मतभेद असतानाही भांडण न करणं हीच देशभक्ती”

“सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरोधात कठोर संघर्ष केला. त्यावरून तुम्ही विचार करू शकता की ते किती पराक्रमी होते. मात्र, त्यांनी आपल्या लोकांसोबत एकही वाद किंवा भांडण केलं नाही. देशभक्ती काय असते? संपूर्ण देशासाठी काम करणं, आपल्या देशातील लोकांसोबत मतभेद असतानाही भांडण न करणं,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. नेताजींची प्रेरणा आध्यात्मिक होती. या प्रेरणेतूनच त्यांनी आपलं सर्वस्व देशासाठी समर्पित केलं, असंही भागवत यांनी नमूद केलं.

हेही वाचा : नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा

१९३९ च्या काँग्रेस अध्यक्षपदाची नेमकी गोष्ट काय?

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस संघटनेचं दरवर्षी अधिवेशन व्हायचं. दरवर्षी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक व्हायची. १९३८ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. यानंतर पुढच्यावर्षी १९३९ चं अधिवेशन मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे झालं. येथे पुन्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. सुभाषचंद्र बोस या दुसऱ्या वर्षीही अध्यक्षपदासाठी उभे राहिले. मात्र, यावर्षी महात्मा गांधी यांनी पट्टाभी सीतारमैया यांना अध्यक्षपदासाठी पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलं. निवडणूक झाली आणि त्यात सुभाषचंद्र बोस यांचा विजय झाला. यामुळे गांधीजी दुःखी झाले. त्यांनी सीतारमैया यांचा पराभव स्वतःचा पराभव समजला.

हेही वाचा : “…तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावं लागेल”; सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

गांधीजींच्या नाराजीनंतर काँग्रेस संघटनेत तणावाची स्थिती निर्माण झाली आणि अध्यक्ष म्हणून निवडून येऊनही सुभाषचंद्र बोस यांना आपली कार्यकारणी देखील निवडता आली नाही. त्यामुळे अखेर सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि स्वतःचा ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan bhagwat comment on subhash chandra bose and mahatma gandhi dispute in congress pbs
First published on: 23-01-2022 at 20:03 IST