गेल्या चार दिवसांपासून श्रीलंकेतच अडकून पडलेल्या मान्सूनचे शुक्रवारी केरळात आगमन झाले. मान्सूनची वाटचाल समाधानकारक असून त्याने केरळसह लक्षद्वीप, कर्नाटक, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील काही भागात आगेकूच सुरू केली आहे. मात्र, मान्सूनच्या सरी अनुभवण्यासाठी महाराष्ट्राला आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर मुंबईवर ढगांची दाटी झाली होती. तसेच सकाळच्या सुमारास काही भागांत तुरळक पावसाने हजेरी लावली.
एरवी नियमितपणे १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा श्रीलंकेत रेंगाळला होता. मात्र, चार दिवस उशिराने का होईना
शुक्रवारी मान्सून केरळात दाखल झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून ३० मे रोजी केरळात येणे अपेक्षित होते, पण तो श्रीलंकेतच थबकल्यामुळे पुढे सरकण्यास त्याला विलंब झाला. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या ४८ तासांतील हवामान अंदाजानुसार मान्सून कर्नाटक, मध्य अरबी समुद्र, तामिळनाडूचा उर्वरित भाग, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश तसेच ईशान्येकडील राज्यांत पोहोचण्यास अनुकूल स्थिती आहे. मोसमी वाऱ्यांचा सध्याचा प्रवाह बळकट नाही, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून येण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागेल.
– डॉ. सुनीतादेवी, संचालक पुणे वेधशाळा
