Moradabad Crime : गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर लहान आणि मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढताना दिसून येत आहे. यामध्ये खून, चैन स्नॅचिंग, घरफोडी यासारख्या घटनांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका महिलेचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन तरुणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरादाबादमधील फुटबॉल खेळाडू असलेल्या मोहित सैनी नावाच्या तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर मोहित याने ओटीटीवर एक वेब सीरिज पाहिली आणि त्यानंतर प्रेयसीची हत्या करण्याची योजना आखली. मोहित याने यामध्ये आपल्या एका मित्रालाही बरोबर घेतलं आणि दोघांनी मिळून प्रेयसीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Crime News : जंगी मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी… सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला काही तासांतच पुन्हा अटक

दरम्यान, मोहित सैनी हा तरुण बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती सांगितली जाते. तो उत्तम फुटबॉल खेळाडूही आहे. मात्र, तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. पण प्रेयसीचीकडून आपली फसवणूक करण्यात येत असल्याने त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला आणि प्रेयसीची हत्या केली. मोहितच्या प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न झालेलं होतं. पण तिच्या पतीबरोबर बोलण्यास मोहितचा विरोध होता. पण तरीही प्रेयसी ऐकत नसल्याने त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेत हत्या केली आणि मृतदेह जंगलात फेकून दिला. या घटनेची माहिती देताना एसपी ग्रामीण कुंवर आकाश सिंह यांनी सांगितलं की, “आरोपीने प्रसिद्ध वेब सीरिज मिर्झापूर पाहिल्यानंतर आपल्या मैत्रिणीचा गळा चिरून खून केला. हा खून करण्याचं कारण म्हणजे आरोपीची प्रेयसी तिच्या नवऱ्याबरोबर बोलत होती, पण त्यासाठी याचा विरोध होता.”

दरम्यान, पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपी मोहितने सांगितलं की, सुमारे दोन वर्षांपूर्वी अंजली ही तिच्या पतीबरोबर त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहायला आली होती. मात्र, अंजलीचा नवरा दिल्लीत हॉटेलमध्ये काम करत होता. त्यामुळे तो अनेक महिने घरी येत नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे अंजली आणि मोहितचे प्रेम झाले. पण तरीही तिने पतीशी बोलणं सुरु ठेवलं. मोहितने खूप समज देऊनही अंजलीने पतीशी बोलणं सोडलं नाही. त्यामुळे हताश होऊन मोहितने अंजलीला संपवण्याचा निर्णय घेतला. मोहितने पोलिसांना असंही सांगितलं की, मिर्झापूर वेब सीरिज पाहिल्यानंतर त्याने अंजलीचा गळा चिरून खून करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moradabad crime a young man killed his married girlfriend after watching a web series on ott two accused arrested gkt