Best City TO Relocate In India For NIR: अनेक अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) भारतात परतण्याचा प्रश्न आता केवळ एक अस्पष्ट विचार राहिलेला नसून, तो एक भावनिक आणि व्यावहारिक विचार झाला आहे. तिशी ओलांडलेल्या एका एनआरआय आईने अलीकडेच केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर भारतात परतल्यानंतर अनिवासी भारतीयांना स्थायिक होण्यासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यापैकी कोणते शहर सर्वोत्तम आहे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दोन वर्षांच्या मुलाची आई असलेली ही महिला तिच्या पतीसोबत परदेशात राहते. महिला म्हणते की भारतात परतण्याचा निर्णय आर्थिक बाबींमुळे घेतलेला नाही. ७ दशलक्ष डॉलर्सची निव्वळ संपत्ती आणि १.३ दशलक्ष डॉलर्सचे घरगुती उत्पन्न असल्याने, आर्थिक परिस्थिती ही चिंताजनक बाब नाही. त्याऐवजी, त्यांना नाते-संबंध, संस्कृती आणि विविधतेची कमतरता जाणवत आहे.

“भारतात परत येण्याचा निर्णय घेण्यामागे एकमेव कारण म्हणजे एकटेपणा आणि कुटुंबापासून दूर राहणे”, असे या महिलेने म्हटले आहे. “येथे जेवणात विविधता नाही. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तीच पनीरची रेसिपी. मला आता बाहेर जेवायचे नाही. आयुष्यात मसालेदार काहीच नाही. तेच ते कंटाळवाणे जीवन आहे”, असेही तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

ही पोस्ट केवळ सुखाची नाही, तर “चविष्ट आयुष्याची” एक आतुरता दर्शवते. परदेशात सुरक्षितता, स्वच्छ हवा आणि चांगल्या पायाभूत सुविधा मिळत असल्या तरी, अनेक अनिवासी भारतीय कालांतराने अशा आयुष्याला भावनिकदृष्ट्या एकटं वाटणारं आणि सांस्कृतिकदृष्ट्या निरस समजू लागतात.

या महिलेची भारतात स्थायिक होण्यासाठी पहिली पसंती बंगळुरूला आहे. त्यांना वाटते की, बंगळुरूमध्ये चांगल्या जीवनशैलीचा खर्च त्यांना परवडेल. मात्र, त्यांच्या मनात काही मूलभूत चिंता आहेत, ज्यात प्रदूषण, दर्जेदार सेंद्रिय अन्नाची उपलब्धता आणि कायदा व सुव्यवस्था यांचा समावेश आहे.

या महिलेने बंगळुरूला स्थायिक होण्याची पसंती दर्शविल्याने अनिवासी भारतीयांसाठी कोणते शहर सर्वोत्तम आहे यावर वाद सुरू झाला आहे. या पोस्टवर टिप्पणी करताना एका युजरने म्हटले की, “हैदराबादला का कमी लेखायचे? आयटी लोकांसाठी ते खरोखरच सर्वोत्तम ठिकाण आहे.”

“तुम्ही बंगळुरूमध्ये सहज सेंद्रिय अन्न खरेदी करू शकता. नियमानुसार, खाजगी कंपनी जे काही देऊ शकते ते तुम्ही येथे पैशाने मिळवू शकता. जिथे सरकारचा हस्तक्षेप असतो तिथे कोणत्याही अपेक्षा ठेवू नका”, असे दुसरा एक युजर म्हणाला.

आणखी एका युजरने मुंबईही चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, “जर तुम्हाला सेंद्रिय अन्न हवे असेल तर मुंबईत राहा. तुम्ही ते जिओ सिटी मॉलमधील अंबानींच्या फॅन्सी किराणा दुकानातून मिळवू शकता. मी अनेक परदेशी लोकांना तिथे खरेदी करताना पाहतो. भारतात प्रदूषणापासून तुमची सुटका नाही. जर ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल (आणि ते असले पाहिजे), तर अमेरिकेत राहणे चांगले.”