दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तब्येतीवरून, डाएटवरून सध्या मोठा गोंधळ चालू आहे. एका बाजूला आप नेते आरोप करत आहेत की, अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगात छळ होत आहे. त्यांना त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकाऱ्यांना समोरासमोर भेटू दिलं जात नाही. त्यांना उच्च मधुमेहाचा (हाय डायबिटीस) त्रास असून तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजनदेखील झपाट्याने कमी होतं आहे. त्यांना औषधंदेखील दिली जात नसल्याचा आरोप आपने केला आहे. या सगळ्या चर्चा होत असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे.

काय आहे अरविंद केजरीवाल यांचं पत्र?

“आजच्या वर्तमानपत्रात तुम्ही जी प्रतिक्रिया दिली ती वाचली. ती प्रतिक्रिया वाचून मला वाईट वाटलं. तिहार तुरुंग प्रशासनाचं पहिलं वक्तव्य-अरविंद केजरीवाल यांनी कधीही इन्शुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र हे संपूर्णपणे खोटं आहे. मी दहा दिवस काय रोज हा मुद्दा उपस्थित करतो की माझ्य इन्शुलिनची आठवण मी रोज करतो आहे. डॉक्टर बघायला आले की मी त्यांना सांगतो माझी शुगर लेव्हल वाढली आहे. मी त्यांना ग्लुको मीटरवरचं रिडिंग बघा. माझी शुगर वाढली आहे. मी ग्लुको मीटरही डॉक्टरांना दाखवलं. माझी शुगर लेव्हल २५० ते ३२० पर्यंत वाढली आहे तर फास्टिंग शुगर १६० ते २०० च्या पातळीवर जाते आहे.”

हे पण वाचा- “केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”

मी रोज इन्शुलिन द्या अशी मागणी केली आहे. तरीही मी तुम्ही असं खोटं वक्तव्य कसं काय करु शकता? तुम्ही हे कसं म्हणू शकता की मी इन्शुलिनचा मुद्दा उपस्थितच केला नाही.

२) तिहार तुरुंग प्रशासनाचं दुसरं वक्तव्य : AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं की चिंतेचा काही विषय नाही.

अरविंद केजरीवाल म्हणाले हा दावाही खोटा आहे. AIIMS च्या डॉक्टारांनी असं कुठलंच आश्वासन दिलेलं नाही. त्यांनी माझ्याकडे माझ्या शुगर लेव्हलचा डेटा मागितला. त्यानंतर सांगितलं की डाटा पाहिल्यावर आम्ही आमचं मत देऊ. मला अत्यंत दुःख वाटतं आहे की राजकीय दबावाखाली येऊन तुरुंग अधीक्षक खोट्या गोष्टी सांगत आहेत. मला आशा आहे की तुम्ही कायद्याचं पालन कराल. असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मागच्या आठवड्यात सुनावणीवेळी ईडीने न्यायालयासमोर म्हटलं होतं की, “केजरीवाल तुरुंगात असे पदार्ध खातायत जे टाईप टू डायबिटीस असलेल्या रुग्णासाठी धोकादायक आहेत. ते दररोज गोड चहा पित आहेत, मिठाई खात आहेत.” ईडीने केजरीवाल यांचा तुरुंगातील १७ दिवसांचा डाएट चार्टदेखील जारी केला होता. आता या पत्रावर काही उत्तर त्यांना दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.