पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १००वा भाग ऐकण्यासाठी अनुपस्थित राहिल्याने चंदीगढमधील पीजीआय नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या ३६ विद्यार्थिनींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही ‘मन की बात’चा उल्लेख ‘मंकी बात’ असा करत मोदी सरकारवर टीकास्र सोडलं.

हेही वाचा – Wrestlers Protest : ब्रिजभुषण सिंह दिल्ली पोलिसांसमोर हजर, जबाबही नोंदवला; चौकशीसाठी एसआयटी समिती नेमली

काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?

“महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करत मोदी सरकारला लक्ष्य केलं. मी ‘मंकी बात’ एकदाही ऐकलेली नाही. मग मलाही शिक्षा होणार का? मलाही आठवडाभर घरात स्थानबद्ध करण्यात येईल का? आता मला खरच काळजी वाटतेय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

३० एप्रिल रोजी चंदीगढमधील पीजीआयच्या इन्स्टिट्यूटच्या एलटी-१ सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १००व्या भाग ऐकण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अशी सुचना पीजीआयच्या संचालकांकडून देण्यात आली होती. मात्र, प्रथम वर्षाला शिकणाऱ्या २८ आणि तृतीय वर्षाला शिकणाऱ्या आठ अशा एकूण ३६ विद्यार्थिनी या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांना एका आठवड्यासाठी वसतीगृहात स्थानबद्ध करण्याची शिक्षा सुनावण्यात आली.